दीपक भातुसे, मुंबई : पालकमंत्री बदलण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत शिवसेनेच्या मंत्र्यांनी आज थेट राज्य मंत्रिमंडळ बैठकीतूनच सभात्याग केला. इतकेच नव्हे तर मंत्रिमंडळ बैठकीतून बाहेर पडण्यापूर्वी बुलेट ट्रेनबाबतचा निर्णयही शिवसेनेने रोखून धरला. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे शिवसेनेची मुख्यमंत्री आणि भाजपाबाबत असलेली तीव्र नाराजी उघड झाली आहे.
भाजपा आणि मुख्यमंत्र्यांकडून अनेकदा दुखावलेला शिवसेनेचा वाघ आता डरकाळ्या फोडू लागला आहे. शिवसेनेने आता थेट मुख्यमंत्री आणि भाजपाविरोधात उघडपणे आघाडी उघडली आहे. शिवस्मारक भूमीपूजन कार्यक्रमात उद्धव ठाकरेंना आणि शिवसेनेला मिळालेली अपमानास्पद वागणूक, नोटबंदीवरून नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंना त्यांच्यासमोरच सुनावले खडे बोल यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते आणि शिवसैनिक प्रचंड दुखावले गेले आहेत. त्यातच मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर अनेकदा जाहीरपणे भाष्य करून मुख्यमंत्र्यांनीही शिवसेनेच्या जखमेवर अनेकदा मीठ चोळलं आहे. त्यामुळे तीव्र नाराज असलेल्या शिवसेनेची नाराजी आता बाहेर पडू लागली आहे.
या नाराजीची पहिली ठिणगी मुंबई महापालिकेतील मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमात पडली. मुंबई महापालिकच्या कार्यक्रमातच नाव न घेता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. या नाराजीवर कडी केली ती शिवसेनेच्या मंत्र्यांनी. थेट मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त करत शिवसेनेचे मंत्री राज्य मंत्रिमंडळ बैठकीतून बाहेर पडले. निमित्त झालं ते पालकमंत्र्यांच्या बदलांचे. मागील आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्रीपदामध्ये काही फेरबदल केले. यात शिवसेनेचे राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे असलेले यवतमाळचे पालकमंत्रीपद काढून ते भाजपाचे राज्यमंत्री मदन येरावार यांच्याकडे देण्यात आले. यवतमाळमध्ये भाजपाचे वर्चस्व प्रस्थापित करण्याची खेळी यामागे आहे.
संजय राठोड यांच्याकडे वाशिमचे पालकमंत्रीपद देण्यात आले. यावरून संजय राठोड यांनी थेट उद्धव ठाकरेंकडे नाराजी व्यक्त केल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय काढून नाराजी व्यक्त करत शिवसेनेचे मंत्री बैठकीतून बाहेर पडले. विशेष म्हणजे शिवसेनेला अंधारात ठेवून मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांमध्ये हे फेरबदल केल्याबद्दलही शिवसेनेने नाराजी व्यक्त केली.
मंत्रिमंडळ बैठकीत बुलेट ट्रेनसाठी बीकेसीमधील जागा अधिग्रहित करण्याचा विषय आयत्यावेळी आणण्यात आला होता. मात्र बैठकीतून बाहेर पडण्यापूर्वी या निर्णयालाही शिवसेनेने कडाडून विरोध केला. अखेर काहीसे नमते घेत बुलेट ट्रेनप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी समितीची स्थापना केली आहे.