मुंबई : बेळगावी इथं होणाऱ्या ९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन स्थळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात येणार आहे. येत्या ६ ते ८ फ्रेबुवारीला नाट्यसंमेलन बेळगावीला होणार आहे.
मुख्य संमेलन स्थळाला बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी तर संमेलनस्थळी उभारण्यात येणाऱ्या मुख्य रंगमंचाला स्मिता तळवलकर रंगमंच, लोकमान्य रंगमंचाला सदाशिव अमरापूरकर रंगमंच आणि जिरगे नाट्यगृहातील रंगमंचाला कुलदीप पवार रंगमंच, सुधीर मोघे खुला रंगमंच अशा नावांनी ओळखण्यात येणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार करणार आहेत.
६ फेब्रुवारीला स्थानिक कलावंताचे कार्यक्रम होणार आहेत. तर ७ फेब्रुवारीला सकाळी ७.३० वाजता नाट्यदिंडीनं संमेलनाचा प्रारंभ होणार असून, १० वाजता उद्घाटन होईल. त्याच दिवशी दुपारी नियोजित नाट्य संमेलनाध्यक्ष फैय्याज यांची प्रकट मुलाखत होणार आहे. एकांकिका महोत्सव, संगीत आणि नृत्याचे कार्यक्रम, बालनाट्य सादर होतील.
सुधीर मोघे खुल्या रंगमंचावर एकपात्री महोत्सव होणार आहे. विच्छा माझी पुरी करा, अवघा रंग एकचि झाला आदी नाटकांचे प्रयोग संमेलनात होणार असून, ८ फेब्रुवारीला संध्याकाळी नाट्यसंमेलनाचा समारोप होईल. दरम्यान, पाहुण्यांची नावं निश्चित झालेली नाहीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.