अतुल सरपोतदार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

मनसेचे सरचिटणीस अतुल सरपोतदार यांच्या पार्थिवावर खेरवाडीतल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या अनेक दिग्गज कार्यकर्त्यांनी भावपूर्ण वातावरणात त्यांना अखेरचा निरोप दिला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 27, 2013, 03:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसेचे सरचिटणीस अतुल सरपोतदार यांच्या पार्थिवावर खेरवाडीतल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या अनेक दिग्गज कार्यकर्त्यांनी भावपूर्ण वातावरणात त्यांना अखेरचा निरोप दिला.
शिवसेना नेते मधुकर सरपोतदार यांचे यांचे अतुल सरपोतदार हे पुत्र... हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं अतुल सरपोतदार यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी शिल्पा सरपोतदार आणि मुलगा जय आहेत.
सरपोतदार हे मनसेच्या महत्वाच्या शिलादारापैकी एक होते. त्यांच्या अचानक जाण्यानं मनसे हादरलीय. `मनसेचा एक मावळा हरपल्या`ची खंत पक्षात व्यक्त होतेय.
राज ठाकरे यांचे अत्यंत निकटचे आणि निष्ठावंत सहकारी अशी अतुल सरपोतदार यांची ओळख आहे. भारतीय विद्यार्थी सेनेपासून ते राज ठाकरे यांच्यासोबत काम करत होते. राज ठाकरे यांनी जेव्हा स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष काढला त्यावेळी त्यांच्या सोबत शिवसेनेला जय महाराष्ट्र करत अतुल सरपोतदार यांनी राज ठाकरे यांची साथ दिली.
अतुल सरपोतदार यांच्याकडे मनसेतील सर्वात मोठी म्हणजे सरचिटणीस ही जबाबदारी देण्यात आली होती. राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी, पक्षातील तळागाळातील कार्यकर्त्यांना आपलेसे वाटणारे नेते म्हणून अतुल सरपोतदार यांची ओळख होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.