www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सरकारी निवासस्थानाच्या डागडुजीचा खर्च सरकारी तिजोरीवर न टाकता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: केलाय. सरकारी तिजोरीवर खर्चाचा भार न टाकता स्वत: खर्च करणारे अजित पवार राज्य मंत्रिमंडळातले एकमेव मंत्री ठरलेत.
देवगिरी या त्यांच्या सरकारी निवासस्थानातील डागडुजीसाठी ३७ लाख ९८ हजार रुपये खर्च सार्वजनिक बांधकाम विभागानं केला . मात्र हा खर्च अतिरिक्त आणि अधिकचा वाटल्यामुळे एकूण खर्चापैकी २७.९ लाख रुपयांचा जास्तीचा खर्च आपण सार्वजनिक बांधकाम विभागाला परत केला असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे. सरकारी निवासस्थानाच्या डागडुजीवर झालेल्या खर्चाची चौकशी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. अजित पवारांनी बंगल्याच्या दुरुस्तीचा खर्च परत केला. मात्र आता इतरही मंत्री खर्च परत करतील का असा प्रश्न आहे.
एकीकडे आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचा मुख्यमंत्री बंगला आणि सुरक्षा नाकारली. पण राज्यातील मंत्री कशी उधळपट्टी करतात याचं सविस्तर वृत्त झी २४ तासने दाखवलं. याचाच परिणाम म्हणून अजित पवारांनी आता पीडब्लूडीला २७ लाखांचा धनादेश सुपूर्द केला आहे.अतिरिक्त खर्चामुळे जनेतेमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी आपण खर्चाची भरपाई देऊ असं पवारांनी सांगितलं होतं.
मुख्यमंत्र्यांच्या `वर्षा` बंगल्यावर एका वर्षात ३३ लाख ५ हजारांचा खर्च झाला आहे. त्याहून अधिक उपमुख्यमंत्र्यांच्या `देवगिरी` बंगल्यावर खर्च झाला होता. गृहमंत्र्यांच्या `चित्रकूट` बंगल्याला २० लाख ४७ हजारांचा खर्च झाला. तर ग्रामविकासमंत्र्यांच्या `रॉयलस्टोन` या बंगल्याला तब्बल १६ लाख १८ हजार रूपये खर्ची टाकण्यात आले. अनिल देशमुखांच्या `जेतवन` बंगल्यालाही १६ लाख ३ हजारांचा खर्च आला आहे. तर विधानसभाध्यक्षांच्या `शिवगिरीवर` १३ लाख १८ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.