मुंबई : बँक एटीएम कार्डवरील व्यवहारांवर मर्यादा आणल्या जात असतांना, आता एटीएमवरील आणखी काही इतर व्यवहार आता मोफत नसतील.
आता बॅलन्स तपासणे, पिन बदलणे आदी गोष्टीही एटीएम ट्रॅन्झॅक्शन म्हणून गणले जाणार आहेत. त्यामुळे हे सारेच व्यवहार मोजून मापून करावे लागणार आहेत. कारण आतापर्यंत केवळ एटीएममधून पैसे काढल्यासच संबंधित व्यवहार हा एटीएम व्यवहार समजला जात होता.
'कधीही पैसे काढता येत असल्याने ग्राहक अनेकदा एटीएममधून छोट्या रकमा काढतात. त्यासाठी एटीएम कोणत्या बँकेचे आहे, हे देखील पाहिले जात नाही. सीसीटीव्ही, वॉचमन आणि अन्य वाढीव सुरक्षा उपयायोजना, बदलते तंत्रज्ञान यामुळे एटीएमवरील खर्च वाढत असल्याने बँकांना एटीएम चालवणे अवघड झाले आहे. त्यामुळे एटीएम व्यवहारांवर बंधने आणणे आवश्यक आहे,' असे बँकेतील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
'ई-बँकिंग, मोबाइल बँकिंग, कार्ड पेमेंटसारख्या चांगल्या सुविधा सध्या उपलब्ध आहेत. एटीएममधून अकाउंटचे स्टेटमेंट घेणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. हे स्टेटमेंट ऑनलाइन पाहणे अधिक सुलभ आहे.
तसेच मोफत एसएमएस अॅलर्टही उपलब्ध आहेत. त्यामुळे एटीएममध्ये फक्त कॅश व्यवहारांवरच भर राहावा, या हेतूने अन्य बाबीही एटीएम व्यवहारांमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत,' असे बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक पी. एन. देशपांडे यांनी म्हटलं आहे.
निर्णय तुमची बँक घेणार
रिझर्व्ह बँकेने एटीएम व्यवहारांची संख्या आणि एटीएम व्यवहारांची कक्षा याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. ती एक नोव्हेंबरपासून लागू होतील; परंतु ही अधिसूचना नसून मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्यामुळे प्रत्येक बँक आपल्या आवश्यकतेनुसार ती लागू करण्याचा निर्णय घेऊ शकते. त्यामुळे ग्राहकांनी बँकेच्या शाखेत जाऊन खातरजमा करावी, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
कसे टाळता येईल शुल्क
बँक एटीएममधील अतिरिक्त व्यवहारांसाठी लागू होणारे शुल्क टाळण्यासाठी काही उपाय करता येऊ शकतात. व्यवहार करताना रोख रकमेऐवजी चेक, क्रेडिट अथवा डेबिट कार्डाचा वापर केल्यास फायद्याचे ठरू शकते.
तसेच एटीएममधून सतत छोट्या छोट्या रकमा काढण्याऐवजी एकावेळी, थोडी अधिक रक्कम काढल्यास पुन्हा लगेच एटीएममध्ये जावे लागणार नाही. शक्य असल्यास प्रत्यक्ष बँकेच्या शाखेत जाऊन पैसे काढावेत; तसेच एटीएममध्ये जाऊन मिनी स्टेटमेंट घेण्याऐवजी ऑनलाइन स्टेटमेंट घ्यावे, हा ही एक उपाय असू शकतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.