`अमर जवान` स्मारकाचे नुकसान, तरूण जेरबंद

मुंबईतील हिंसाचारावेळी `अमर जवान` स्मारकाचे नुकसान करणाऱ्या तरूणाला पोलिसांनी अटक केली. या तरूणाची सीसीटीव्ही फुटेज आणि माध्यमांनी केलेल्या चित्रीकरणानंतर ओळख पटली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 28, 2012, 12:43 PM IST

www.24taas.com,मुंबई
आसामच्या मुद्दावर मुंबईत हिंसाचार घडवून आणला गेला. यावेळी सीएसटी जवळील अमर जवान स्मारकाचे नुकसान करणाऱ्या तरूणाला आज मंगळवारी पोलिसांनी जोगेश्वरीतून अटक केली.
ही कारवाई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली आहे. मुंबईतील हिंसाचाराच्यावेळी अमर जवान स्मारकाचे नुकसान अब्दुल कादीर याने केल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि माध्यमांनी केलेल्या चित्रीकरणानंतर त्याची ओळख पटली आहे.
अब्दुलला जोगेश्वरी पूर्व भागातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आणखी काही दोषींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. आझाद मैदानाबाहेर झालेल्या हिंसेप्रकरणी आतापर्यंत ५० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. या हिंसाचारात दोन जण ठार, तर अनेक जण जखमी झाले होते.
या प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांची बदली करण्यात आली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईचे नवे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांची सोमवारी भेट घेत दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करताना पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्याचे आवाहन केले होते.