माथेरानमध्ये आता आकाशाशीही नातं जोडता येणार

मुंबईपासून जवळ असलेलं हिलस्टेशन म्हणजे माथेरान... अनेक पर्यटकांचं आकर्षण असलेल्या माथेरानमध्ये आता तुम्हाला आकाशाशीही नातं जोडता येणार आहे. 

Updated: May 14, 2016, 10:59 PM IST
माथेरानमध्ये आता आकाशाशीही नातं जोडता येणार title=

मुंबई : मुंबईपासून जवळ असलेलं हिलस्टेशन म्हणजे माथेरान... अनेक पर्यटकांचं आकर्षण असलेल्या माथेरानमध्ये आता तुम्हाला आकाशाशीही नातं जोडता येणार आहे. 

दाट वनराई... मन प्रसन्न करणारा निसर्ग... दऱ्याखोऱ्यातून धावणारी मिनीट्रेन... घोड्यांची रपेट... देशविदेशातल्या पर्यटकांचं आकर्षण असलेल्या माथेरानची ही ओळख... आता यात आणखी एका गोष्टीची भर पडणार आहे... इथून तुम्हाला आता कोट्यवधी किलोमीटर दूर असलेले तारे आणि आकाशगंगेचा अभ्यास करता येणार आहे... जिल्हा प्रशासन आणि नगरपालिकेनं 70 लाख रुपये खर्चून इथं आकाश दर्शन प्रकल्प उभारलाय... खगोलप्रेमींसाठी ही मोठीच पर्वणी आहे..

ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाची उभारणी करण्यात आलीये. इथं ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी विदेशी बनावटीच्या अत्याधुनिक 8 दुर्बिणी आहेत. हौशी खगोलप्रेमींना मार्गदर्शन करण्यासाठी इथं अभ्यासू व्यक्तींची नेमणूक करण्यात येणार आहे... याशिवाय इथं एक थ्री-डी थिएटरही असेल, यात अवकाश अभ्यासाच्या चित्रफिती दाखवल्या जातील... तसंच इथं एक प्रदर्शनही मांडण्यात आलंय... 

पर्यटक, हौशी खगोल अभ्यासक आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. निसर्गाशी नातं जोडणारं माथेरान या केंद्राच्या माध्यमातून आता आपलं आकाशाशीही नातं जडवणार आहे.