www.24taas.com, मुंबई
सुखदा-शुभदा प्रकरणी रणजित देशमुखांनी केलेल्या आरोपांना अजित पवारांनी पत्युत्तर दिलंय. आपला त्या इमारतीत एकच फ्लॅट आहे. बेनामी फ्लॅट असल्याचा दावा कोण करत असेल, तर त्याचे पुरावे द्यावेत, असं आव्हानही अजितदादांनी दिलंय.
मुंबईत आणखी एक आदर्श घोटाळा उघड झालाय. वरळीतल्या सुखदा-शुभदा सोसायटीतल्या सदस्यांना अनधिकृत बांधकामाप्रकरणी मुंबई महापालिकेनं नोटीस बजावलीय. या सोसायटीमध्ये अजित पवार, गोपीनाथ मुंडे, माणिकराव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांचे फ्लॅटस आहेत.
वरळीमधली सुखदा-शुभदा सोसायटीत... या सोसायटीतल्या अनधिकृत बांधकामांबाबत मुंबई महापालिकेनं अनेक राजकीय नेत्यांना नोटीस बजावलीय. ही जागा सीआरझेडमध्ये येत असल्यानं, या इमारतीला वाढीव एफएसआय देता येत नाही. मात्र नियम डावलून या इमारतींच्या अनेक फ्लॅट्समध्ये बदल करण्यात आलेत. या सोसायटीमध्ये अजित पवार, गोपीनाथ मुंडे, शिवराज पाटील, माणिकराव ठाकरे, पतंगराव कदम, अनिल देशमुख, रणजित देशमुख, प्रतापसिंह मोहिते पाटील आणि अण्णा डांगे या राजकीय नेत्यांचे फ्लॅटस आहेत. या सगळ्यांना महापालिकेनं नोटीसा बजावल्यायत.
मुळात मुंबई पोलिसांसाठी राखीव असलेला हा भूखंड नंतर नेत्यांच्या सोसायटीसाठी देण्यात आला होता. सुखदा-शुभदासह कृष्णा, वैतरणा, वैनगंगा, गोदावरी, पूर्णा, भीमा या नेत्यांच्या सोसायटी याच भूखंडावर आहेत.. सुखदा-शुभदा सोसायटीतल्या अनधिकृत बांधकामांबाबत सामाजिक कार्यकर्ते अमित मारू यांनी मुंबई पालिकेकडे तक्रार केली होती. त्यानंतर पालिकेनं या नोटीसा पाठवल्यात. आता या प्रकरणी काय कारवाई होणार आणि खरंच कारवाई होणार का, याकडे लक्ष लागलंय.