www.24taas.com, दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई
दादरसारख्या मराठीबहुल परिसरात गेल्या ६० वर्षांपासून मराठीपण मिरवणारे दत्तात्रय हॉटेल मे महिन्यापासून बंद होत आहे. वाढती महागाई, रोडावलेले ग्राहक आणि कर्मचायांची कमतरता यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचं हॉटेल मालकांचं म्हणणं आहे.. यानिमित्तानं मुंबईतल्या मराठी हॉटेलांच्या भवितव्याचा मुद्दा ऐरणीवर आलाय. दादरच्या शिवाजी पार्क परिसरातलं सुप्रसिद्ध दत्तात्रेय हॉटेल.. काही ठिकाणं ही त्या त्या ठिकाणची अस्मिता असतात.. ज्यांच्या नावावर आजूबाजूचा पत्ता सापडण्याचा मान अशा ठिकाणांना असतो.. त्यापैकी दत्तात्रय हे एक..
बटाटा वडा असो की मिसळ. गरमागरम थालिपीठ असो की मराठमोठी राईसप्लेट.. यासह अनेक मराठमोळ्या पदार्थांसाठी हे हॉटेल खरतरं या भागात प्रसिद्ध.. ६० वर्षांपासून मराठी माणसांच्या उदरभरणाच्या यज्ञकर्माचं काम करणारं हे हॉटेल आता इतिहासजमा होणार आहे. हॉटेलात कामांसाठी मुलं मिळत नसल्यानं आणि ग्राहक रोडावल्यानं ही वेळ आल्याचं हॉटेलमालक प्रकाश वागळे सांगतात. ४ मे १९५३रोजी सदानंद वागळे यांनी या उपहारगृहाची सुरुवात केली... त्यानंतर त्यांचे पुत्र प्रकाश वागळे यांनी ही धुरा समर्थपणे सांभाळली पण आता वयाच्या ६४व्या वर्षी हॉटेल चालवणं अशक्य वाटू लागल्यानं त्यांनी हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतलाय. दत्तात्रयची चव चाखणा-यांना याची खंत वाटतेय.
दत्तात्रेय सारखं मराठमोळं हॉटेल बंद होत असल्याचं निमित्त असलं तरी यामुळं काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.. एकेकाळी ब्राह्मण आणि भंडारींच्या खानावळींनी गिरणगाव जगवलंय. कालांतरात गिरणगाव उद्धवस्त होत गेलं, आणि मराठी भंडारींच्या खानावळींवरही ही आच येत गेली.. त्यातच पंजाबी, चायनीज, गुजराती, मल्टि कुझिन यासारख्या खाद्यसंस्कृतीच्या आक्रमणात मराठी पदार्थही मागे पडत गेले.. त्यासाठीच्या मार्केटिंगमध्येही मराठी हॉटेल व्यवसायिक मागे पडले.. यातूनच दत्तात्रेयसारख्या एकेकाळी सुप्रदिध हॉटेलांना उतरती कळा लागली.. असं असलं तरी याच भागात असलेले प्रकाश, आस्वाद, सुजाता यासारख्या हॉटेलांनी मात्र काळानुरुप बदल घडवत आपला दबदबा कायम ठेवला.. त्यामुळे बंद पडणा-या `दत्तात्रेय` बंद पडण्याचा दोष कुणाचा, याचा विचार मालकांनीच केलेला बरा..