मुंबई : गणेशोत्सवाची धामधूम संपता संपता, आता लोकशाहीच्या उत्सवाला सुरूवात होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. आजपासून राज्यात विधानसभा निवडणुकांचे नगारे वाजू लागणार आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची आजच घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. ९ ते १७ ऑक्टोबर दरम्यान दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक होईल, अशी माहिती मिळत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दिल्लीत पत्रकार परिषद होणाराय. त्यावेळी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील, असं सांगितलं जातंय. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत गणपती कुणाला पावणार आणि कुणाचे विसर्जन होणार, याचा फैसला ऑक्टोबरमध्ये होणार आहे.
महाराष्ट्रात दोन टप्प्यात मतदान झाले तर ९ ते १६ ऑक्टोबर दरम्यान आणि एकाच टप्प्यात मतदान झाले तर १६ किंवा १७ ऑक्टोबरला निवडणूक होण्याची शक्यता आहे. म्हणजेच गणेशोत्सवानंतर ऐन नवरात्रामध्ये विधानसभा निवडणूक प्रचाराचा दांडिया रंगणार आहे.
दसऱ्यानंतर मतदान आणि दिवाळीपूर्वी म्हणजे २१ ऑक्टोबरपूर्वी मतमोजणी होण्याची शक्यता वर्तवली जातेय. कुणाचे दिवाळे काढायचे आणि कुणाची दिवाळी साजरी करायची, याचा फैसला महाराष्ट्रातील जनताजनार्दन करणार आहे. आज निवडणुकीची घोषणा झाली तर आजपासूनच राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.