www.24taas.com, मुंबई
सरकारी धोरणांच्या निषेधार्थ स्कूल बसचालकांनी राज्यव्य़ापी संपाचा इशारा दिला आहे. ९ मार्चपासून हा संप पुकारण्यात येणार आहे. ऐन परीक्षांच्या काळात संप पुकारल्यानं विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. दहावी बारावीच्या परीक्षांच्या काळातच संप करुन विद्यार्थी आणि पालकांना वेठीस धरण्यात येत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे. मुंबईतल्या स्कूल बस चालक संघटनांच्या बेमुदत संपाच्या विरोधात पालक संघटनांनी हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
स्कूल बसने प्रवास करणा-या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या कायद्यात बदल करण्याची मागणी बस चालक संघटनांनी केली आहे. मात्र मागण्या धुडकावण्यात आल्यामुळं सरकारवर दबाव वाढवण्यासाठी या संघटनांनी बेमुदत संपाचं हत्यार उपसल आहे. उद्यापासून हा संप पुकारण्यात आलाय. मात्र हा संप अवैध असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या विरोधात असल्याचं पालक संघटनांचं म्हणण आहे. या संपाला चाप लावण्यासाठी पालक संघटनांनी जनहित याचिका दाखल करण्यासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेणार आहेत.
दरम्यान, देशव्यापी संपामध्ये मुंबईतील कर्मचारी संघटना सहभागी झाल्या नव्हत्या. यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याचं कारण पुढे केलं होतं. मात्र स्कूलबसच्या चालकांनी यापासून काहीच बोध न घेता ९ मार्चमध्ये ऐन परीक्षांच्या काळातच संपावर जाण्याची भाषा केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी हे काळजीचं कारण बनलं आहे.