रेव्ह पार्टी: राहुल शर्मासह ४२ जण दोषी

जुहूतल्या ‘ओकवूड’ रेव्ह पार्टीत आपण ड्रग्ज घेतलंच नव्हतं, असं छातीठोकपणे सांगणाऱ्या राहुल शर्माची टेस्ट पॉझिटीव्ह आलीय. त्यामुळे त्याने या पार्टीत ड्रग्ज घेतल्याचं सिद्ध झालंय. तसंच वेन पार्नेलसह इतर ४२ जणांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्यात.

Updated: Jul 20, 2012, 10:38 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

जुहूतल्या ‘ओकवूड’ रेव्ह पार्टीत आपण ड्रग्ज घेतलंच नव्हतं, असं छातीठोकपणे सांगणाऱ्या राहुल शर्माची टेस्ट पॉझिटीव्ह आलीय. त्यामुळे त्याने या पार्टीत ड्रग्ज घेतल्याचं सिद्ध झालंय. तसंच वेन पार्नेलसह इतर ४२ जणांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्यात.

 

२० मे रोजी पोलिसांनी जुहू भागातल्या ओकवूड हॉटेलवर धाड टाकली होती. ३८ मुली आणि ५८ मुलांना ताब्यात घेतलं गेलं होतं. तसंच पार्टीसाठी आणलेले अंमली पदार्थही पोलिसांनी जप्त केले होते. त्‍यावेळी ९६ जणांच्‍या रक्ताचे नमुने घेण्‍यात आले होते. त्‍यापैकी सर्वप्रथम ४४ जणांचे रक्ताचे नमुने पॉझिटीव्‍ह आले होते. तर आज मिळालेल्या अहवालात आणखी ४२ जणांनी ड्रग्ज घेतल्याचं सिद्ध झालंय. या सर्वांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्यात. ताब्यात घेतलेल्यांपैकी फक्त दोन महिलांच्या टेस्ट निगेटीव्‍ह आल्यात. राहुल शर्मा, वेन पॉर्नेल, मनिषा कोईराला, अतूल अग्निहोत्री, अभिनेत्री शिल्पा अग्निहोत्री असे अनेक सेलिब्रिटीज पोलिसांच्या तावडीत सापडले होते. यापैकी अभिनेता अतूल अग्निहोत्रीचा अहवाल पॉझिटीव्‍ह आला होता. तर आता क्रिकेटपटू राहुल शर्मा आणि वेन पार्नेल यांचाही अहवाल पॉझिटीव्‍ह आला आहे.

 

राहुल शर्माची टेस्ट पॉझिटीव्ह, क्रिकेट सोडणार?

धक्कादायक बाब म्हणजे, या पार्टीत राहुल शर्मा आणि वेन पार्नेल हे आयपीएलचे दोन खेळाडूही सहभागी झाल्याचं समोर आलं होतं. पण, यानंतर पुणे वॉरियर्सचा खेळाडू राहुल शर्मा यानं यावर स्पष्टीकरण देत ‘ती रेव्ह पार्टी होती, याची मला किंचितही नव्हती कल्पना. मी तर वाढदिवसाच्या पार्टीला गेलो होतो’ असं राहुलनं म्हटलं होतं. इतकंच नव्हे तर रक्ताचे नमुने पॉझिटिव्ह आले तर क्रिकेट सोडून देईन असंही राहुलनं म्हटलं होतं. राहुल शर्मा हा आयपीएलमध्‍ये पुणे वॉरियर्ससंघाचं प्रतिनिधित्व करतो. तर पार्नेल हा दक्षिण आफ्रिकेचा बॉलर आहे.