राज-मुनगंटीवार भेटीने नाशिकचा गुंता सुटणार?

नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला महापौर होण्याची शक्यता वाढली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Updated: Mar 13, 2012, 06:58 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला महापौर होण्याची शक्यता वाढली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सुधीर मुनगंटीवार राज ठाकरे यांच्या भेटीनंतर आता शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी अनेक पर्यायांवर चर्चा झाली. यात मनसेला पाठिंबा देण्याची भूमिका सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. भाजपने मनसेला पाठिंबा दिला तर शिवसेना तटस्थ राहील की पाठिंबा देईल यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

 महापौर मनसेचा - नांदगावकर

या भेटीच्या वेळी मनसेचे आमदार बाळानांदगावकर होते. त्यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितले, की नाशिकमध्ये मनसेचा महापौर होणार हा आम्हांला विश्वास आहे. मनसेला जनादेश मिळाला आहे. ठाण्यामध्ये आम्ही जी भूमिका घेतली, त्या प्रकारे इतर पक्षांनीही भूमिका घ्यावी, असेही नांदगावकर यांनी सांगितले.

 

 

राजकारणात अशा गाठीभेटी होतात- भांडारी

राजकारणात अशा प्रकारे गाठीभेटी होत असतात. आम्ही नाशिकबाबत यापूर्वीची भूमिका घेतली होती, की सेना, भाजप, आरपीआय युतीने मनसेला सोबत घेऊन हा गुंता सोडवावा. आता गुंता सोडविण्याचे काम सुरू आहे. नाशिकमधील जनतेचा सन्मान राखला गेला पाहिजे. तो राखण्यासाठी त्यांना स्थीर सरकार देणे आमचे कर्तव्य असल्याचे भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितले.