राज ठाकरेंवर उद्धव यांचे तोंडसुख

मुंबईत बंडखोरीचं निशाण नको, असं भावनिक आवाहन शिवसैनिकांना करत, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गटनेत्यांच्या मेळाव्यात मुंबई महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुकलं. त्याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेतले.

Updated: Jan 11, 2012, 11:37 AM IST

www.24taas.com , मुंबई

 

मुंबईत बंडखोरीचं निशाण नको, असं भावनिक आवाहन शिवसैनिकांना करत, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गटनेत्यांच्या मेळाव्यात मुंबई महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुकलं. त्याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेतले.

 

 

शिवसेनाप्रमुखांसाठी मुंबई महापालिकेवर आणि विधानसभेवर भगवा फडकवणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बेळगाव-सीमाभागतल्या मराठी माणसांच्या व्यथा आपण जाणतो, असं सांगत, या मुद्द्यावर ढोंगीपणा करत नाही, असं सांगत, त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. होय, मुंबईत आपण करुन दाखवलंच, असं सांगत, त्यावर टीका करणा-या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली.

 

 

मुंबई महापालिकेच्या आणि शिवसेनेच्या कामात सहभाग नोंदवणा-या कार्यकर्त्यांना अभिवादन करुन, त्यांनी सर्व पदाधाकि-यांना मुंबई महापालिकेवर आणि विधानसभेवर भगवा फडकवण्याचे भावनिक आवाहनही उद्धव यांनी केलं.

 

 

 पँथरची मनधरणी

महायुतीच्या बैठकीत मानापमान नाट्य रंगल्यानंतर रिपाइं नेते रामदास आठवले यांच्याकडून दलित पँथरचे नामदेव ढसाळ यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु झालेत. यासाठी मंगळवारी रात्री दोन्ही नेत्यांची भेट झाली. या भेटीत ढसाळ यांनी दलित पँथरसाठी मुंबईत पाच जागांची मागणी केली. मुंबईतल्या रमाबाई नगर, चेंबूर, माटुंगा, कफ परेड आणि कांदिवली या जागांची मागणी त्यांनी आठवले यांच्याकडे केलीय. याशिवाय नागपुरात सहा ते सात, सोलापूर, पुण्यात प्रत्येकी पाच, नाशकात चार, पिंपरी चिंचवडमध्ये तीन आणि ठाण्यात एका जागेची मागणी ढसाळांनी केलीय.

 

 

शिववड्यावर स्वाभिमानचं तेल

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि राणे यांच्यात पुन्हा वादाची चिन्हं दिसू लागलीत. शिवसेनेच्या शिववडा योजनेला विरोध करणा-या नीतेश राणेंनी आता निवडणूक आचारसंहिता असल्यानं या स्टॉल्सवरील शिववडा या नावावर स्टिकर्स लावण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केलीय. नीतेश राणेंच्या स्वाभिमान संघटनेच्या पदाधिका-यांनी आयोगाकडे तक्रार करून अशी मागणी केलीय.

 

आचारसंहितेच्या कालावधीत मतदार प्रभावित होईल अशा प्रकारच्या कामांवर बंदी घातली जाते तसंच राजकीय फलकांवरही कारवाई केली जाते. उत्तर प्रदेशातही मायावती आणि हत्तीचे पुतळे झाकण्याचा कार्यक्रम सध्या सुरु आहे. शिववडा नावाला स्वाभिमाननं असाच आक्षेप घेतलाय. शिववडा या नावानं मतदार प्रभावित होऊ शकतात असा स्वाभिमानचा आक्षेप आहे.