'मुंबई सेंट्रलला राजीव गांधीचं नाव द्या'

राजकीय नेत्यांना मुंबईतील रेल्वे स्टेशन्सच्या नामांतराचा मुद्दा महत्वाचा वाटतो. आता मुंबई सेंट्रलला राजीव गांधी यांचे नाव देण्याची मागणी काँग्रेच्या काही खासदारांनी केली आहे.

Updated: May 21, 2012, 10:24 PM IST

 www.24taas.com, मुंबई

 

मेगा ब्लॉक, तांत्रिक बिघाड,पावसामुळे रेल्वे ठप्प होणं हे मुंबईकरांच्या पाचवीला पुजलेले विषय. या विषांना हात घालुन ते सोडवण्यापेक्षा राजकीय नेत्यांना मुंबईतील रेल्वे स्टेशन्सच्या नामांतराचा मुद्दा महत्वाचा वाटतो. आता मुंबई सेंट्रलला राजीव गांधी यांचे नाव देण्याची मागणी काँग्रेच्या काही खासदारांनी केली आहे.

 

मुंबईत आजही ब्रिटीशकालीन इमारती आहेत. काही स्थानकांना ब्रिटीशांनीच दिलेली नावं आजही उच्चारात आहेत. मात्र राजकीय पक्षांना अचानक ही नावं खटकायला लागतात. आणि मग नामांतराचा मुद्दा तापायला लागतो. नुकतीच काँग्रेसच्या ५० खासदारांनी रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली. मागणी होती मुंबई सेंट्रलचं नाव बदलुन राजीव गांधी यांच नाव देण्यात यावं.

 

शिवसेनेनं या विषयाला विरोध केला. नामंतर आणि त्यावरून खेळल्या जाणाऱ्या राजकीय खेळी काही नवीन नाहीत. १९९६ साली बॉम्बेचं मुंबई झालं. नंतर व्हीटीचं सीएसटी. बांद्रे-वरळी सी-लिंकच्या नावावरून बराच वाद झाला होता. सध्या दादरचं नाव बदलुन चैत्यभूमी करण्यात यावं यावरून राजकारण तापलंय. त्यातच आता मुंबई सेंट्रलचं नाव बदलण्याचा नावा घाट घातला जातो आहे. मात्र स्टेशन्सची नावं बदलुन प्रवाश्यांना पदरी काय पडतं ? साधारणपणे ७० लाख मुंबईकर रोज रेल्वेनं प्रवास करतात.

 

सुरक्षेच्या कारणास्तव जीव मुठीत घेउन त्यांना प्रवास करावा लागतो. सुविधांच्या नावानं तर ओरड आहे. त्यामुळे नामांतराचा मुद्या उचलुन राजकारण खेळण्यापेक्षा केंद्राकडून निधीचा ओघ वाढवुन पायाभुत सुविधा वाढवण्यावर जोर धरल्यास मुंबईकरांना नक्कीच फायदा होईल.