काँग्रेसला 'गुरु' मंत्र, आघाडी नको!

आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करू नये यासाठी उत्तर मध्य मुंबईचे खासदार गुरुदास कामत आक्रमक झालेत. त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांना जागावाटपासाठी २००७ सारखी एक बैठक बोलावण्याचे आदेश दिलेत

Updated: Jan 7, 2012, 12:02 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करू नये यासाठी उत्तर मध्य मुंबईचे खासदार गुरुदास कामत आक्रमक झालेत. त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांना जागावाटपासाठी २००७ सारखी एक बैठक बोलावण्याचे आदेश दिलेत.

 

यात काँग्रेसचे सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी आणि नगरसेवकांसोबत ही बैठक बोलवण्याचे आदेश दिलेत. या बैठकीतच सर्वांच्या संमतीनेच राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात यावा असं त्यांनी म्हटलंय. २००७ साली कामत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनीही अशाच पद्धतीनं बैठक बोलावली होती.

 

का भडकले कामत ?

कालच गुरुदास कामत यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून राष्ट्रवादीसोबत आघाडी करु नका, अशी विनंती केलीय.मात्र, कांग्रेसचे मुंबई अध्यक्ष कृपाशंकर सिंग राष्ट्रवादीला ६५ जागा देण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं. त्यावर आता गुरुदास कामत चांगलेच आक्रमक झालेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसशी आघाडी केली नाही, त्यामुळे मुंबईत त्यांच्याशी आघाडी का करावी. काँग्रेस एकट्याने लढून सत्ता आणण्यास समर्थ आहे, राष्ट्रवादी मागे फरफट नको, असा विरोधही  गुरुदास कामत यांनी व्यक्त केला आहे.

 

कामत यांनी काय म्हटले आहे पत्रात!

आघाडी नको या अशा आशयाचे पत्र मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांना पाठवून आघाडीत खोडा घालण्याचा प्रकार केला आहे. आघाडी झाली तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उद्रेक होईल. जिंकणाऱ्या जागा काँग्रेसला का द्याव्यात, असा सवालही गुरूदास कामत यांनी आपल्या पत्रात व्यक्त केला आहे.

 

 

आघाडी करण्यासंदर्भात बैठक झाली त्यावेळी गुरूदास कामत यांनाही आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, आपला निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांनी बैठकीला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते एकाही बैठकीला उपस्थित राहिले नाही. आता त्यांनी आपला निषेध सोनिया गांधी, मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे प्रभारी यांनी पत्र लिहून व्यक्त केला आहे.
गेल्या १२ वर्षापासून काँग्रेस राष्ट्रवादी राज्यात सत्तेवर आहेत. मात्र. गेल्या २० वर्षांपासून मुंबईवर शिवसेना-भाजपचे सरकार आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीवर नजर टाकली असता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकूण ३६ टक्के मतदान झाले होते तर शिवसेना- भाजप २५ टक्के मते मिळवून सत्तेत गेली होती. त्यामुळे हे गणित लक्षात घेता दोन्ही काँग्रेसने आघाडी करण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून बैठकांना जोर आला आहे.अभ्यासपूर्ण दाखला

 

राष्ट्रवादीचा पलटवार

गुरूदास कामतांच्या पत्रामुळे या आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होत  आहे. दरम्यान, आघाडीसाठी आम्ही काँग्रेसच्या मागे लागलो नाही, त्यांना आघाडी करायची असेल तर त्यांचे स्वागत आहे. नाही करायची तर तसे त्यांनी सांगू द्यावे, असे मत राष्ट्रवादीचे प्रवक्ते मदन बाफना यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितले.