काँग्रेसने केली सेनेशी मैत्री, राणेंना धक्का...

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाली आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या मैत्रीच्या नव्या समीकरणामुळे ११ जागा बिनविरोध झाल्या आहेत. यानिमित्तानं काँग्रेस-शिवसेनेच्या दोस्तीची चर्चा सुरू झाली.

Updated: Jul 14, 2012, 07:04 PM IST

www.24taas.com, दीपक भातुसे, देवेंद्र कोल्हटकर, मुंबई

 

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाली आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या मैत्रीच्या नव्या समीकरणामुळे ११ जागा बिनविरोध झाल्या आहेत. यानिमित्तानं काँग्रेस-शिवसेनेच्या दोस्तीची चर्चा सुरू झाली. शिवसेनेशी हातमिळवणी करताना काँग्रेसनं राणेंना मात्र धक्का दिला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं प्रणव मुखर्जींना दिलेल्या पाठिंब्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसमधल्या नव्या मैत्री पर्वाची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. विधानपरिषद निवडणुकीनं त्यावर शिक्कामोर्तब केलं.

 

विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसनं शिवसेनेला मदतीचा हात दिला. ११ जागांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली. चौथा उमेदवार उभा करायचा की नाही, याबद्दल काँग्रेसनं शेवटच्या क्षणापर्यंत पत्ते राखून ठेवले. अखेर काँग्रेसच्या तीनच उमेदवारांनी अर्ज भरले आणि शिवसेना निर्धास्त झाली. या निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेस-शिवसेनेच्या मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली असली तरी विधानपरिषद आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा संबंध नाही, असा दावा काँग्रेसचे नेते करतात.  काँग्रेस-शिवसेनेच्या राजकीय समझोत्यामुळे सगळ्याच पक्षांची डोकेदुखी संपली. शेकापच्या जयंत पाटलांना फक्त चारच आमदार असल्यानं २१ मतं मिळवण्याची गरज होती पण निवडणूक बनविरोध झाल्यानं शेकापची डोकेदुखी संपली. भाजपलाही दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी ४ मतांची गरज होती.

 

पण निवडणूक बिनविरोध झाल्यानं भाजपही बिनधास्त झालं. राष्ट्रवादीकडे ७५ मतं असली तरी तिसऱ्या उमेदवारासाठी त्यांना कसरत करावी लागणार होती. दगाफटका नको, म्हणून ज्यादा मतांचीही गरज होती. पण या राजकीय समझोत्यामुळे राष्ट्रवादीचंही फावलं. शिवसेनेला दुसऱ्या उमेदवारासाठी ५ मतांची आवश्यकता होती. काँग्रेसची मदत मिळाल्यानं शिवसेनेचे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

 

यामध्ये तोटा झाला तो काँग्रेसचा. काँग्रेसचे चार उमेदवार निवडून येणं शक्य होतं. पण या समझोत्यामुळे एक उमेदवार कमी झाला. या निवडणुकीत राणे समर्थक रवींद्र फाटकांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. पण शिवसेनेबरोबर हातमिळवणी करतानाच राणेंनाही काँग्रेसनं धक्का दिला. काँग्रेस आणि शिवसेनेच्या मैत्रीच्या या नव्या समीकरणामुळे सध्या तरी सगळ्याच पक्षांची विधानपरिषद निवडणुकीची गणितं चुटकीसरशी सुटली.