www.24taas.com, मुंबई
महाराष्ट्रातील आघाडीची वृत्तवाहिनी असलेल्या ‘झी 24 तास’वर जागर बोलीभाषेचा हा अनोखा उपक्रम सुरु करण्यात आला असून दर बुधवारी एका बोलीभाषेतून त्या भागातील बातम्या प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. या बुधवारी मालवणी भाषेतून या उपक्रमाची सुरुवात होणार असून गणपती उत्सवाच्या तयारीत दंग असलेल्या मालवणी मुलखातील खबरबात खास मालवणी बोलीतील बातम्यांमधून सादर केली जाणार आहे. ‘झी 24 तास’वर संध्याकाळी सात वाजता, रात्री नऊ आणि साडे अकरा वाजता हे बातमीपत्र प्रक्षेपित होणार आहे. मालवणीसह वऱ्हाडी, झाडीबोली, अहिराणी, तावडी, कोकणी, संगमेश्वरी, बाणकोटी, आगरी, तंजावरी, वारली, वाडवळ आदी बोलीभाषेतूनही बातम्या सादर केल्या जाणार असून मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
‘झी 24 तास’ ही महाराष्ट्राची आवडती वृत्तवाहिनी जशी सर्वात आधी आणि अचूक बातम्या प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी एक पाऊल पुढे आहे, तशीच राज्याच्या सामाजिक, सांस्कृतिक विकासाला हातभार लावण्यातही आघाडीवर आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून या बुधवारपासून ‘जागर बोलीभाषेचा’ हा उपक्रम सुरु करण्यात येत आहे. दर दहा मैलांवर बदलत जाणाऱ्या आपल्या माय मराठीचं खरं सौष्ठव आहे ते तिच्या असंख्य बोलीभाषांमध्ये.
बदलत्या काळात यातील अनेक बोलीभाषांचा आपल्याला विसर पडू लागला आहे. जागर बोलीभाषेचा या उपक्रमातून बोलीभाषांची नव्यानं ओळख करून देण्याचा प्रयत्न ‘झी 24 तास’ करणार आहे. बोलीभाषा जगवण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून ‘झी 24 तास’ करणार आहे.