यवतमाळ : दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या एका पोलीस पाटलाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना यवतमाळ जिल्ह्यात घडलीय. कारेगाव यावली गावचे पोलीस पाटील वीरेंद्र राठोड यांची दगडानं ठेचून हत्या करण्यात आलीय.
वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडलाय. दारू माफियांनी त्यांची हत्या केली असावी, असा प्राथमिक संशय आहे. गावामध्ये दारूबंदी करण्यासाठी महिलांनी मोहीम सुरू केली होती. पोलीस पाटील वीरेंद्र राठोड यांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेतला होता.
राठोड यांनी काल महिलांची बैठक आयोजित केली होती. त्याच रागातून त्यांची हत्या करण्यात आली असावी, असं बोललं जातंय. याप्रकरणी ४ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दरम्यान, एका पोलीस पाटलाची हत्या करण्यापर्यंत दारू माफियांची मजल गेल्याबद्दल संताप व्यक्त होतोय. कायदा व सुव्यवस्थेचा धाक दारू माफियांना राहिलेला नाही, संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.