दोंडाईचा शिरपूरची सत्तासुंदरी कोणाकडे...

राजकारणात घराणेशाही हा परवलीचा आणि कार्यकत्यांच्या अंगवळणी पडलेला शब्द झालाय. सत्ताधरी असो की विरोधक प्रमुख नेते... सत्तासुंदरी आपल्या घराबाहेर पडू नये असं नियोजन नेहमी करत असतात. घराणेशाहीचा अनोखा सोहळा धुळे जिल्ह्यातील मतदार अनुभवतायत. जिल्ह्यातील दोंडाईचा आणि शिरपूर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे प्रमुख उमेदवार घराणेशाहीतूनच मतदारांसमोर आले आहेत. 

Updated: Nov 7, 2016, 10:07 PM IST
दोंडाईचा शिरपूरची सत्तासुंदरी कोणाकडे... title=

प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : राजकारणात घराणेशाही हा परवलीचा आणि कार्यकत्यांच्या अंगवळणी पडलेला शब्द झालाय. सत्ताधरी असो की विरोधक प्रमुख नेते... सत्तासुंदरी आपल्या घराबाहेर पडू नये असं नियोजन नेहमी करत असतात. घराणेशाहीचा अनोखा सोहळा धुळे जिल्ह्यातील मतदार अनुभवतायत. जिल्ह्यातील दोंडाईचा आणि शिरपूर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे प्रमुख उमेदवार घराणेशाहीतूनच मतदारांसमोर आले आहेत. 

लोकशाहीला घराणेशाही शाप की वरदान यावर शेकडो वेळा मंथन झालंय... विशेष म्हणजे काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपवासियांनाही घराणेशाहीचा मोह आवारात आलेला नाही. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा आणि शिरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीतील उमेदवारांकडे पाहिलं की घराणेशाहीचा प्रभाव जाणवतो. या दोन्ही नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदाचे सर्व प्रमुख उमेदवार हे घराणेशाहीचे वारसदार आहेत. याला ना काँग्रेस अपवाद आहे ना भाजप... ज्या घराणेशाहीच्या आरोपामुळे काँग्रेसची सत्ता गेली त्या काँग्रेस पक्षानं शिरपूरमध्ये आमदार अमरिश पटेल यांच्या पत्नी जयश्रीबेन पटेल यांना उमेदवारी दिलीय. भाजपनंही अमृता महाजन यांना उमेदवारी देऊन त्यांच्या सासऱ्यांची परंपरा पुढे नेलीय.

दोंडाईचा नगरपालिका देखील घराणेशाहीला बळी पडलीय. इथं काँग्रेस पक्षानं माजी मंत्री हेमंत देशमुखांच्या घरातीलच उमेदवार पुढे केलाय. राजेंद्र देशमुख किंवा जुई देशमुख इथं नगराध्यक्ष पदाच्या काँग्रेस उमेदवार असतील. तर भाजप देखील घराबाहेर सत्ता जाऊ द्यायला तयार नाही. भाजपने मंत्री जयकुमार रावळ यांच्या मातोश्रींना निवडणूक रिंगणात उतरवलंय. नयनकुवरताई रावळ यांना उमेदवार दिलीय.

सत्ताराणी आपल्याच घराची दासी बनावी अशी व्यूहरचना काँग्रेस म्हणा की भाजप या दोघांचीही आहे. अश्या परिस्थितीत दोंडाईचा आणि शिरपूर पालिकेत मत द्या कुणालाही पण  घराणेशाहीतूनच आलेला उमेदवार नगराध्यक्ष बनणारेय. त्यामुळे लोकशाहीत या सत्ता केंद्रीकरणाच्या नावानं चांगभलं असं म्हणण्याची वेळ आलीय.