साईदीप ढोबळे झी मिडिया जुन्नर : जुन्नर पालिकेत कुणाची सत्ता येणार, जुन्नकर कुणाच्या ताब्यात नगर परिषदेचा कारभार सोपवणार...
जुन्नर.. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी... पुणे ग्रामीण जिल्ह्यातली सर्वात जुनी नगरपरिषद... या जुन्नरच्या पालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं. सध्या या नगर परिषदेत राष्ट्रवादी कॉग्रेसचे ७, शिवसेनेचे ८ तर मनसेचे २ असे एकूण १७ नगरसेवक आहेत.
शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक असताना मनसेच्या पाठिंब्यानं राष्ट्रवादीची सत्ता इथं आहे. इथं शिवसेना आणि राष्ट्रवादीची अनेकदा सत्ता आली. पण शहराचा म्हणावा तसा विकास झाला नाही. त्यामुळंच यंदा उच्च शिक्षीत आणि समस्या सोडवणारे उमेदवार निवडून आणण्याचा नागरिकांचा कल असणार आहे.
जुन्नरमध्ये प्रवेश करताना शिवनेरीच्या विकास निधीतून उभारलेली ही स्वागत कमान लक्षवेधी ठरते. पण जुन्नर शहरात पाणी, सार्वजनिक शौचालये, कचरा, रस्ते दुरावस्था अशा अनेक समस्या आहेत. याच मुद्यावरून शिवसेनेची कोंडी करण्याची तयारी भाजपनं केलीय... युतीबाबत अद्याप वरिष्ठ पातळीवर निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळं स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी दोन्ही पक्षांनी चालवलीय.
गेल्या नगर परिषद निवडणुकीच्या वेळी जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार होते. मात्र आता जुन्नरमध्ये मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे निवडून आलेत. त्यामुळं आता राष्ट्रवादीसोबत आघाडी न करता, स्वतः निवडणूक लढवण्याची तयारी मनसेनं केलीय. पण मनसेच्या चिन्हाऐवजी स्थानिक सर्वपक्षीय आघाडीच्या चिन्हावर ही निवडणूक लढवली जाणाराय.
यंदा जुन्नरमध्ये शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी अशीच थेट लढत रंगू शकते, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.
जुन्नर नगरपरिषदेत चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्यात नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार असल्यानं ती निवडणूकही रंगतदार ठरणाराय...