नांदेड : धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत जुन्या सरकारनं खोडी करून ठेवली आहे. त्यामुळेच आरक्षणचा निर्णय घ्यायला विलंब होत असल्याचं स्पष्टीकरण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये दिले. या प्रश्नी वेळ दया. संवैधानिक बाबींची पूर्तता करून धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेऊ असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.
नांदेड जिल्ह्यातील माळेगाव इथे आयोजित धनगर समाज जागर मेळ्याव्यात ते बोलत होते. मागील सरकारने फसवल्याची टीका करत धनगर समाजाला आरक्षण देण्यास राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली. धनगर समाजाला आरक्षण देण्याचा सरकारचा प्रामाणिक प्रयत्न आहे. कायद्याच्या चौकटीत राहून धनगर समाजाच्या आरक्षणासाठी केंद्राकडे शिफारस करण्यात आली आहे.
मागील सरकारने या समाजाला झुलवत ठेवले. ते आता भूलथापा देत आहेत. आम्ही सर्व पुरावे आणि अहवाल सादर करून धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या प्रयत्नात आहोत. मराठवाडय़ात दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना जगण्याची ताकद मिळावी, तसेच धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आपण खंडोबाला साकडे घातले आहे, असेही त्यांनी सांगितले.