अब्दुल सत्तारांनी केला मतदार याद्यांमध्ये घोळ?

लोकसभा निवडणुकीमध्ये पुणे, सांगलीतल्या मतदार याद्यांमधला घोळ समोर आल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीपूर्वी औरंगाबादमध्ये मतदार यादीतील घोळ उघड झालाय. हा घोळ काँग्रेसचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी घडवून आणल्याचा आरोप भाजपनं केलाय तर निवडणूक विभागानंही याची गांभीर्यानं दखल घेतलीय.

Updated: Sep 13, 2014, 12:16 PM IST
अब्दुल सत्तारांनी केला मतदार याद्यांमध्ये घोळ?  title=

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीमध्ये पुणे, सांगलीतल्या मतदार याद्यांमधला घोळ समोर आल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीपूर्वी औरंगाबादमध्ये मतदार यादीतील घोळ उघड झालाय. हा घोळ काँग्रेसचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी घडवून आणल्याचा आरोप भाजपनं केलाय तर निवडणूक विभागानंही याची गांभीर्यानं दखल घेतलीय.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यातला मोठा घोळ समोर आलाय. सिल्लोड विधानसभा मतदार यादीत जवळपास 40 हजार नावं बोगस आढळून आलीत. तहसीलदार आणि निवडणूक विभागानं तक्रार केल्यानंतर झालेल्या चौकशीत हा घोळ समोर आलाय. या मतदारांची नावं औरंगाबादच्या वेगवेगळ्या मतदारसंघातही आहेत आणि सिल्लोडमध्येही त्यांच्या नावांचा समावेश आहे. 

यासंदर्भात सिल्लोडच्या स्थानिक भाजप नेत्यांनी तक्रार केली होती. या बोगस नावांमधली बहुतांश नावं मुस्लिम समाजाची असल्याचा आरोप भाजपनं केलाय. तसंच सिल्लोडचे विद्यमान आमदार आणि काँग्रेसचे मंत्री अब्दुल सत्तार यांनीच हा घोळ केल्याचाही भाजपनं आरोप केलाय. 

औरंगाबाद जिल्ह्याच्या निवडणूक विभागानंही मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचं मान्य केलंय. मात्र, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 31 जुलैला अंतिम यादी जाहीर केल्यानंतर आता नावं वगळणं शक्य नसल्याचं उपजिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र, ही सगळी नावं आता एसडी लिस्टमध्ये टाकणार आणि या नावाच्या मतदारांवर प्रशासन कडक लक्ष ठेवणार असल्याचं निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी म्हटलंय. 


अब्दुल सत्तार

मतदारयादीत नावांच्या समावेशावरून आता राजकारण सुरू झालंय. भाजप आरोप करत असलं तरी यात काहीही तथ्य नसल्याचा खुलासा अब्दुल सत्तार यांनी 'झी मीडिया'च्या प्रतिनिधीशी बोलताना केलाय. 

कागदपत्रांची पूर्तता केल्यावरच नावं यादीत समाविष्ट करता येतात, आता यातलं सत्य शोधण्याचं काम निवडणूक विभागाचं असलं तरी ही नावं समाविष्ट होत असताना निवडणूक विभाग नक्की काय करत होतं याचीही चौकशी करण्याची गरज निर्माण झालीय.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.