देवरुख मातृमंदिरचे कार्याध्यक्ष विजय नारकर यांचे निधन

देवरुखमधील मातृमंदिरचे कार्याध्यक्ष विजय ऊर्फ भाऊ नारकर यांचे निधन झाले. त्यांच्यावर समाजवादी विचारसरणीचा पगडा होता.  

Updated: Oct 11, 2016, 06:37 PM IST
देवरुख मातृमंदिरचे कार्याध्यक्ष विजय नारकर यांचे निधन  title=

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखमधील मातृमंदिरचे कार्याध्यक्ष विजय ऊर्फ भाऊ नारकर यांचे निधन झाले. त्यांच्यावर समाजवादी विचारसरणीचा पगडा होता. समाजवादी विचारसरणीचे खंदे कार्यकर्ते हरपले, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे मावशी हळबे यांनी मातरूमंदिर ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना दिली. या संस्थेचे ते कार्याध्यक्ष होते. ते भाऊ नारकर या नावाने प्रसिद्ध होते. त्यांचे काल रात्री ९ वाजता देवरूख येथे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. गेले काही दिवस ते आजारीच होते. त्यांना मातरुमंदिर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विजय नारकर यांनी देहदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार काल रात्रीच त्यांचे पार्थिव चिपळूण जवळील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात नेण्यात आले. तेथे आज दु. १२ वाजेपर्यंत तेथे अनेकांनी अंत्यदर्शन घेतले.

दरम्यान, त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे काही वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मातृरुमंदिरच्या कार्यकारिणी सदस्या शांता नारकर या आहेत. विजय नारकर १९६९ च्या सुमारास मातृरुमंदिरच्या कामात सहभागी झाले आणि अखेरीपर्यंत तेथे कार्यरत होते. 

देवरुख परिसरातील गावांमध्ये त्यांनी सामाजिक कार्याचा एक मापदंडच घालून दिला. लोकसहभागातून १००हून अधिक गावांमध्ये त्यांनी पाणीपुरवठ्याच्या योजना राबविल्या होत्या. त्यांच्या काळात मातृरुमंदिरचे एका वटवृक्षात रुपांतर झाले. मातृमंदिर या संस्थेतर्फे रुग्णालयासोबतच गोकुळ हे अनाथ मुलींचे वसतीगृह, आयटीआय, शेती कॉलेज असे विविध उपक्रम चालविले जात आहेत.

मातृमंदिरची स्थापना

देवरुख येथे मातृमंदिरच्या मावशी ऊर्फ इंदिराबाई हळबे यांनी मातृमंदिरची स्थापना १९५४ साली केली. समाजसेवेसाठी आणि गोरगरिबांना आरोग्य सेवा पुरविता याव्यात यासाठी दोन खाटांच्या प्रसूतिगृहाने मातृमंदिरची सुरुवात केली. मावशींच्या धडाडीने प्रभावित होऊन देवरुखच्या लक्ष्मणराव राजवाडेंनी आपली २४ एकर जागा मावशींना सामाजिक कार्यासाठी मोफत दिली. या जागेतच मातृमंदिररुपी रोपटयाचा महाकाय वृक्ष आज विस्तारला आहे. ग्रामीण दुर्गम भागात कार्यरत असताना अनाथ मुलांची होणारी परवड नजरेत आल्यावर त्यांनी गोकुळ या अनाथालयाची स्थापना केली.