नाशिक : जिल्ह्यातील सप्तश्रुंगी गडावर देवीच्या दर्शनाला पायी चालत जाणाऱ्या भाविकांनाही आता टोल द्यावा लागणार आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयाने भाविकांत नाराजी आहे. खानदेशचं कुलदैवत असलेली सप्तश्रुंगी देवी. या देवीला जाण्यासाठी लाखो भाविक खानदेश, गुजरात, मुंबईहून चालत येतात.
काहीजण श्रद्धेपोटी गडाच्या खालूनच पायपीट करत गड चढतात. अशा सर्व भाविकांना आता दोन रूपये प्रवेश कर म्हणजे टोल लावण्याचा निर्णय सप्तश्रुंगी ग्रामपंचायत आणि कळवण पंचायत समितीने ठरवलं
आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत याला विरोध झाला असला तरी स्थानिक पदाधिकारी हट्टाला पेटले आहेत. भाविकांत नाराजी आहे.
सप्तश्रुंगी संस्थान गावात कोणतीही साफसफाई करत नसल्याने भाविकांना मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी निधीची पूर्तता त्यातून करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र सामाजिक आणि मुलभूत सुविधा देत नसल्याचा आरोप सप्तश्रुंगी संस्थानाने फेटाळलाय.
सध्या अनेक तीर्थक्षेत्रांवर पार्कींग कराच्या नावाखाली भाविकांची लूट सुरू आहे. त्यातच आता हा नवा प्रकार सुरू झाल्यास इतरत्रही त्याचं अनुकरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने वेळीच यात लक्ष घालून हे प्रकार थांबवण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.