पाकिस्तानला कारगिलसारखंच उत्तर द्या : शरद पवार

उरीच्या दहशतवादी हल्ल्याला कारगिलसारखंच उत्तर देण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री असताना आक्रमक भाषा वापरणारे मोदी आता अनुभवातून शहाणे झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 

Updated: Sep 28, 2016, 08:55 AM IST
पाकिस्तानला कारगिलसारखंच उत्तर द्या : शरद पवार title=

खोपोली : उरीच्या दहशतवादी हल्ल्याला कारगिलसारखंच उत्तर देण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री असताना आक्रमक भाषा वापरणारे मोदी आता अनुभवातून शहाणे झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 

भारत आणि पाकिस्तानचे बिघडलेले संबंध हा चिंतेचा विषय आहे. मात्र, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मांडलेली भूमिका योग्य आहे. आम्ही त्यांच्या भूमिकेचे स्वागत करतो, असे पवार म्हणालेत.

युद्ध करणे हा सामान्य चर्चेचा विषय नाही. याबाबतीत केंद्र सरकारने राष्ट्रपती; तसेच तिन्ही सेनादलाच्या प्रमुखांना पूर्ण विश्‍वासात घेऊन अंतिम निर्णय घ्यावा, असा सल्लाही पवार यांनी दिला.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेऊन सरकारने आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. मात्र इतर समाजांच्या हक्कांवर गदा येणार नाही याची दक्षताही घ्यावी असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला दिला आहे. 

राज्यात मराठा समाजाचे मोर्चे पाहता इतर समाजाला आहे ते आरक्षण कायम ठेवून सरकारला मराठा समाजाच्या आरक्षणावर तातडीने निर्णय घ्यावा लागेल. यातून कोणत्याही समाजावर अन्याय होण्याचा प्रश्‍न नाही, असे पवार म्हणालेत.