ठाणे : कापूरबावडी परिसरात चालत्या रिक्षातून उडी मारल्यानं कोमात गेलेल्या तरुणीवर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.
या तरुणीनं उडी मारण्याला कारणीभूत असलेल्या रिक्षा चालकाचं स्केच पोलिसांनी जारी केलं आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तीनही संशयितांचे स्केच जारी करण्यात आलयं.
या रिक्षावाल्याचा शोध घेण्यासाठी आता ठाण्यातले रिक्षा चालकही सरसावलेत. रिक्षा चालकांनी स्वतः शोध मोहिम हाती घेतलीय.
तसंच रिक्षा ज्या परिसरातील असेल त्या परिसराचे नाव रिक्षावर टाकण्यात यावे, अशी मागणीही काही रिक्षा चालकांनी केलीय.
यामुळे रिक्षा कुठली आहे हे समजण्यास मदत होणार आहे. कोमात गेलेल्या तरुणीच्या कुटुंबाच्या मागे ठामपणे उभे राहणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.
कापूरबावडी इथून घरी जाण्यासाठी स्वप्नाली लाड एका रिक्षात बसली होती. मात्र रिक्षावाला चुकीच्या दिशेने नेत असल्याचं पाहून तिनं आरडाओरडा केला.
मात्र तो थांबत नसल्याचं पाहून स्वप्नालीनं चालत्या रिक्षातून उडी मारली. धावत्या रिक्षातून उडी मारल्यानं तिच्या डोक्याला जबर मार लागला आणि ती कोमात गेली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.