चंद्रपूर : खरतर कधी कधी जंगली श्वापदांपेक्षा माणसांचे वागणं हे हिस्त्र असतं आणि याचाच प्रत्यय आला ताडोबाच्या जंगलात. चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात काही हौशी फोटोग्राफर आणि पर्यटकांनी रात्रीच्या वेळी प्रवेश करून धुडगूस घातल्याचा धक्कादायक आणि चीड आणणारा प्रकार समोर आलाय. वन्यजीव अभ्यासकांनी या प्रकारावर चिंता व्यक्त केलीय.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात काही हौशी फोटोग्राफर आणि पर्यटकांनी असा धुडगूस घातलाय. वनविभागाचे सर्व नियम अक्षरश धाब्यावर बसवत ताडोबाच्या आगरझरी ते कालापानी परिसरात फिरत होते. आठवडाभरापूर्वी कुठलीही परवानगी न घेता हे पर्यटक आगरझरी परिसरातल्या घनदाट जंगलात घुसले. त्यावेळी त्यांना रस्त्याच्या बाजूला एक वाघ दिसला. त्यावेळी हे पर्यटक तर अधिकच चवताळले आणि त्यांनी गाड्या वाघाच्या मागे पुढे लावून त्याचा रस्ता अडवला. पुढे त्यांना पुन्हा ४ वाघ त्यांना दिसले. तेव्हाही या पर्यटकांनी वाघांचा पाठलाग करत मनसोक्त फोटो काढण्याचा असुरी आनंद घेतला.
या उपद्रवाची माहिती मिळाल्यानंतर ग्रीन प्लॅनेट सोसायटीनं या प्रकाराची वनविभागाकडे तक्रार केलीय. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या आणि शिका-यांच्या रडारवर असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात झालेला हा प्रकार अतिशय धक्कादायक आहे. यापुढे असे प्रकार होऊ नयेत यासाठी दोषींवर कडक कारवाई होणं आवश्यक आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.