पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये होणा-या 89व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीपाल सबनीस यांची निवड झालीये.
पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात आज मतमोजणी झाली. सबनीस यांनी विठ्ठल वाघ यांचा ११२ मतांनी पराभव केलाय... सबनीस यांना ४८५ तर वाघ यांना ३७३ मतं पडली...
यंदा साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मतदान झालं होतं. तसंच यावेळी प्रचारही जोमात झाला होता. सबनीस यांनी गेल्या वर्षी मावळते अध्यक्ष सदानंद मोरे यांना पाठिंबा दर्शवला होता...
श्रीपाल सबनीस यांना सर्वाधिक ४८५ मते पडली. विठ्ठल वाघ यांना ३७३, अरूण जाखडे यांना २३०, शरणकुमार लिंबाळे यांना २५ तर श्रीनिवास वारुंजीकर यांना अवघी दोन मते पडली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर यांनी मतमोजणीनंतर श्रीपाल सबनीस यांच्या विजयाची घोषणा केली.
साहित्य महामंडळाने मताधिकार असलेल्या सदस्यांकडे एकूण एक हजार ७५ मतपत्रिका पाठविल्या होत्या. त्यापैकी गुरुवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत एक हजार ३३ मतपत्रिका महामंडळाकडे परत आल्या होत्या. त्याची मतमोजणी शुक्रवारी करण्यात आली. साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठीच्या आजवरच्या निवडणुकीतील हे सर्वोच्च मतदान असल्याचे आडकर यांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.