पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी अखेर माघार घेतलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी केलेल्या वक्तव्याबाबत सबनीसांनी दिलगिरी व्यक्त केली.
पंतप्रधान मोदींना पत्र लिहून त्यांनी याबाबत खुलासा केलाय. मोदींबाबत मांडलेली भूमिका योग्य होती मात्र पंतप्रधानांचा केलेला एकेरी उल्लेख अयोग्य असल्याचीही कबुली सबनीस यांनी दिलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतचे आक्षेपार्ह शब्द मागे घेत असल्याचे जाहीर करून पिंपरी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सबनीस यांनी याबाबतच्या वादावर मंगळवारी पडदा टाकला.
'माझ्या वक्तव्याने अनेक जण दुखावले आहेत, याची मला जाणीव आहे. पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख योग्य नाही. त्यामुळे मी माझे शब्द मागे घेतो, फेकून देतो,' असे नमूद करून सबनीस यांनी पत्रकार परिषदेत दिलगिरी व्यक्त केली. यामुळे संमेलनावरील वादाचे सावट दूर झाल्याचे मानले जात आहे.
भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक खासदारांपासून काही कार्यकर्त्यांनी सबनीस यांच्या विरोधात निदर्शने केली होती. तसेच सबनीस यांनी माफी मागावी; अन्यथा त्यांना संमेलनस्थळी फिरकू देणार नाही, अशी धमकीही देण्यात आली होती.