नाशिक : बागलाण तालुक्याचे आराध्यदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यात्रा उत्सवाला थाटात प्रारंभ झाला. पुढचे १५ दिवस यात्रा सुरु राहणार आहे. सरकारी सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांचे मंदिर उभारून त्यांच्या नावाने यात्रा भरविणारे सटाणा देशातील एकमेव शहर आहे.
सटाणाचे पहिले तहसीलदार होण्याचा मान प्राप्त असलेल्या यशवंत महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक लोकहिताची कामे केली. दुष्काळात तर सरकारी तिजोरी रिकामी करून शेतकरी, जनावरे तसेच नागरिकांना वाचविण्याचं काम केलं. त्यांच्या या कार्यामुळे लोकं त्यांना देवासमान मानू लागले. त्यांच्या नावाने आरम नदीच्या काठी भव्य मंदिर उभारण्यात आलं आहे. दरवर्षी देवमामलेदारांच्या जयंतीनिमित्त येथे यात्रा भरते.
देवमामलेदार यात्रेचे बागलाण परिसरात महत्त्व आहे. यशवंत महाराजांनी सटाण्याप्रमाणे धुळे, अमळनेर, सिंदखेडा, येवळा येथे शासकीय सेवा बजावली होती. त्यामुळे या भागासह राज्यातील विविध ठिकाणाहू भाविक पायी येतात.
पंधरा दिवस हि यात्रा सुरू असते. देवमामलेदारांनी ज्या पध्दतीने सरकारी सेवेत राहून लोकाभिमुख कामे केली त्यानं जनतेच्या मनात स्थान प्राप्त केलंय. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून पारदर्शक कामं करण्याची गरज आहे.
पाहा व्हिडिओ