पुणे: हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवरायांचं अस्सल खरं चित्र महाराष्ट्रात परत आणण्याची मोहीम पुण्याचे मालोजीराव जगदाळे या तरूणाने फत्ते केली आहे. महाराजांचं मूळ चित्र म्हणून राज्य शासनाने यापूर्वीच याच चित्राला मान्यताही दिली आहे. या बरोबरच महाराजांचं यापूर्वी कधीही न पाहीलेलं रंगीत चित्र नेदरलँड आणि क्रोएशियामधील संग्रहकांकडून मालोजीराजेंनी आणलं आहे.
हे चित्र 1920 मध्ये मॅकेंझी कलेक्शन या ग्रंथातून कॉपी करण्यात आलं होतं. मात्र या चित्राची मूळ प्रत राज्याच्या संग्रही नव्हती. अखेर चित्राची मूळ प्रत मिळवण्यात पुण्यातल्या शिवप्रेमींना यश आलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मॅकेंझी कलेक्शनमधल्या या चित्राचा शोध घेण्याचं काम मालोजीराव करत होते. हाच शोध घेत असताना फ्रान्स्वा वालन्तैन या डच अधिकाऱ्याच्या ग्रंथाचा त्यांना शोध लागला. खरं तर मॅकेंझी कलेक्शनमधील शिवरायांचं खरं चित्र याच ग्रंथावर बेतलंय.
या ग्रंथाच्या अवघ्या 2 ते 3 प्रती सध्या जगात उपलब्ध आहेत. याच ग्रंथाच्या काही सुट्या पानांचा शोध मालोजीरावांना नेदरलँडमध्ये लागला. हा अनमोल ठेवा परत मिळवण्यासाठी प्रसंगी वाटाघाटी करून, हुज्जत घालून मालोजीरावांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि त्याला यशही आलं.
कॉपर एनग्रेव्हींग पद्धतीने बनवलेलं हे चित्र काळ्या रंगात आहे. अंगावर उपरणं परिधान केलेले आणि मराठी दागिने आणि जिरेटोप परिधान केलेले शिवाजी महाराज या चित्रात दिसतात.
डच शिष्टमंडळाने शिवरायांना दिलेल्या भेटी दरम्यान हे चित्र काढल्याच्या नोंदी आहेत. या चित्रासोबतच याआधी कधीही न पहायला मिळालेलं शिवाजी महाराजांचं अश्वारूढ चित्रंही मालोजीराव यांनी विकत घेतलं आहे. इटालियन प्रवासी निकोलाय मनुची याच्या चित्राशी मेळ खाणारं हे चित्र असलं तरी ते फ्रान्सच्या झेनेती या चित्रकाराने साकारलं असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.