पुणे : शरद पवार यांनी काढलेला दुष्काळ दौरा नसून ती दुष्काळ सहल आहे अशी खरमरीत टीका, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पुण्यामध्ये केली.
दुष्काळासारख्या गंभीर परीस्थितीचा आनंद कसा घ्यायचा हे पवारांकडून शिकण्यासारखं आहे, असा टोलाही खोत यांनी लगावाल. दुष्काळी तालुक्यांसाठी वेगळं महामंडळ स्थापन करावं अशी मागणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांनी केली होती. त्यावर सत्तेत असताना काय केलं हे शरद पवार यांनी सांगावं, असा सवाल खोत यांनी यानिमित्तानं केला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल चौतीस वर्षांनी आज प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन मोर्चाचं नेतृत्व केलं. दुष्काळग्रस्त भागासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी पवारांनी मोर्चाही काढला. त्याचवेळी केंद्र सरकारवर टीकेची तोफही डागली. दुष्काळाच्या भीषण झळांत होरपळणाऱ्या मराठवाड्यातल्या उस्मानाबादमध्ये शरद पवारांनी मोर्चाचं नेतृत्व केलं.
आताच्या सरकारला शेतकऱ्यांसाठी काही करायची इच्छा नाही, असा टोला पवारांनी यावेळी लगावला. पोकळ घोषणा करुन सरकार दिशाभूल करु पाहत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला. मात्र सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर १४ सप्टेंबरनंतर जेलभरो आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, आत्महत्या करायची नाही अशी भावनिक साद शेतकऱ्यांना घालत, शरद पवारांनी परिस्थितीमुळे पार खचलेल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला धीर द्यायचा प्रयत्नही केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.