SPECIAL : शरीराची साथ नसताना त्याच्या गगनभरारीला सलाम!

एखादी गोष्ट करायची ठरवली की आपल्याकडे काय नाही आहे यापेक्षा आपल्याकडे काय आहे याचा विचार केला तर आपण यशस्वी होऊ शकतो, असा मंत्र आपल्या आयुष्यात पाळून यशस्वी ठरतोय तो कोल्हापूरचा शैलेश नेर्लिकर... शरीराचा कोणताही अवयव काम करत नसताना केवळ बुद्धीच्या जोरावर त्याने थेट आंततराष्ट्रीय मजल मारली आहे.

Updated: Dec 23, 2016, 07:33 PM IST
SPECIAL : शरीराची साथ नसताना त्याच्या गगनभरारीला सलाम! title=

कोल्हापूर : एखादी गोष्ट करायची ठरवली की आपल्याकडे काय नाही आहे यापेक्षा आपल्याकडे काय आहे याचा विचार केला तर आपण यशस्वी होऊ शकतो, असा मंत्र आपल्या आयुष्यात पाळून यशस्वी ठरतोय तो कोल्हापूरचा शैलेश नेर्लिकर... शरीराचा कोणताही अवयव काम करत नसताना केवळ बुद्धीच्या जोरावर त्याने थेट आंततराष्ट्रीय मजल मारली आहे.

शैलेशचा आजवरचा प्रवास

जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर माणूस काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कोल्हापूरच्या नेर्ली गावाचा शैलेश नेर्लिकर... शरीर साथ देत नसलं तरीही बुद्धीच्या जोरावर त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारली. वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत अगदी सर्वसामान्य मुलाप्रमाणेच शैलेश आयुष्य जगत होता... मात्र, सहाव्या वर्षी झालेल्या 'मुडदूस' आजाराने त्याचं आयुष्यच बदलून गेलं...

मुडदूस आजारामुळे कॅल्शियमची कमतरता त्याच्या शरीरात जाणवू लागली आणि म्हणून डॉक्टरांनी त्याला कॅल्शियमचा डोस द्यायला सुरुवात केली... हा कॅल्शियमचा डोस इतका जास्त झाला की त्यामुळे शैलेशच्या शरीराचा एक एक अवयव काम करेनासा झाला... अखेर त्यांचं संपूर्ण शरीर ताठर बनलं. फक्त बुद्धी शाबूत राहिली आणि याच राहिलेल्या बुद्धीच्या जोरावर आज तो आपलं सकारात्मक आयुष्य हसत-खेळत जगतोय. अर्थात यासाठी त्याने आधार घेतला तो बुद्धीबळाचा...


शैलेशसोबत आई सरला नेर्लिकर

माऊलीची माया...

गावातल्या बुद्धीबळ स्पर्धांमधून त्याने सुरुवात केली आणि मग राष्ट्रीय स्तरावर ब्रॉन्झ मेडल ते आंतरराष्ट्रीय स्तरावरचं मानांकन इथपर्यंतचा प्रवास त्याने आत्तापर्यंत केलाय... आता यापुढेही ग्रँण्डमास्टर होण्याचं स्वप्न तो उराशी बाळगून आहे. अर्थातच या साऱ्या प्रयत्नांसाठी त्याची आई सरला नेर्लिकर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी आहे.

जिथे जिथे त्याच्या स्पर्धा होतात तिथे तिथे शेलैशला अक्षर: कडेवर उचलून ही माऊली स्पर्धा गाठत असते... तो जिंकला की त्याच्या आनंदात सहभागी व्हायचं आणि तो हरला की त्याला पुन्हा पुढच्या स्पर्धेसाठी तयार करण्याचं काम आई करत असते... शैलेशची जबाबदारी लिलया पार पाडत असतानाच गावचं सरपंच पदंही त्या तेवढ्याच ताकदीने पार पाडत असतात... शैलेश आणि त्याच्या आईच्या कर्तृत्वाला लाख लाख सलाम...