'कॅशलेस'च्या भानगडीत ग्राहकांना चुना!

देशभरात सध्या कॅशलेस सेवासुविधांचा बोलबाला सुरु असताना जळगावात मात्र याच कॅशलेस व्यवहारातून फसवणूक झालीय. एका महिला ग्राहकाची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आलीय.

Updated: Dec 23, 2016, 06:58 PM IST
'कॅशलेस'च्या भानगडीत ग्राहकांना चुना! title=

विकास भदाणे, जळगाव : देशभरात सध्या कॅशलेस सेवासुविधांचा बोलबाला सुरु असताना जळगावात मात्र याच कॅशलेस व्यवहारातून फसवणूक झालीय. एका महिला ग्राहकाची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आलीय.

जळगाव शहरातील श्रीकृष्ण कॉलनीतील राहवासी असलेल्या आशिष शिंदे यांनी डॉमिनोज पिझ्झा येथून पिझ्झा, कटलेटसह इतर पदार्थांची ऑर्डर दिली. शिंदे यांचे एक हजार १८५ रुपयांचे बिल झाले, स्वॅप मशीन बंद असल्याने डॉमिनोज मधील कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या लिंकवर ऑनलाईन पेमेंट करण्यास सांगितले, त्यानुसार शिंदे यांनी पत्नीच्या आयसीआय बँकेतील खात्यातून पैसे अदा केले. मात्र पेमेंट झाले नसल्याचे कारण सांगून पुन्हा त्यांना पेमेंट करण्यास सांगितले. त्यामुळे शिंदे यांच्या पत्नीने पुन्हा एक हजार १८५ रुपयांचे पेमेंट केले. असे दोन वेळा पेमेंट केल्याने त्यांच्या खात्यातून दोन हजार तीनशे सत्तर रुपये विड्रॉ झाले. 

दुसऱ्या दिवशी शिंदेनी बँकेत जाऊन खात्यातील रक्कमेची माहिती घेतली असता त्यांच्या खात्यातून वीस हजार, पाच हजार, आणि नऊ हजार असे ऑनलाईन वि़ड्रॉ करून एकूण ३४ हजार रुपयांची रक्कम परस्पर खात्यातून काढण्यात आल्याचं लक्षात आलं. त्यामुळे शिंदे यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार अर्ज दिला असून या प्रकरणी चौकशी सुरु आहे.

पोलिसांत तक्रार देऊन अजूनही ठोस कारवाही केलेली नाही. नोटबंदीनंतर देशात कॅशलेस व्यवहाराचे वारे वाहू लागलेत. मोबाईल डेबिट कार्डद्वारे साधा भाजीवालाही पेमेंट स्वीकारत आहे. मोबाईलवर विविध कंपन्यांनी अॅप कार्यान्वित केले आहे. नागरिकही आता हळूहळू कॅशलेस व्यवहाराकडे वळू लागलेत. मात्र अशा प्रकारे ऑनलाईन खरेदीद्वारे फसवणूक होण्याचेही प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने कॅशलेस पद्धतीने व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात अडकलेत.