चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, 'ती'च्या वाढदिवसालाही कुणी आलं नाही!

औरंगाबादेत गेल्या महिन्यात आठ वर्षांच्या एका मुलीवर शाळेतील शिक्षकानंच अत्याचार केल्याचं समोर आलं...  फक्त शिक्षकच नाही तर तिला शाळेत नेणारा रिक्षा चालकही त्यात सहभागी असल्याचं पुढे आलं... या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलीय मात्र या घटनेनं या मुलीचं आणि तिच्या कुटुंबाचं आयुष्यच बदलून गेलंय. 

Updated: Sep 15, 2016, 02:38 PM IST
चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, 'ती'च्या वाढदिवसालाही कुणी आलं नाही! title=
प्रातिनिधिक फोटो

विशाल करोळे, औरंगाबाद : औरंगाबादेत गेल्या महिन्यात आठ वर्षांच्या एका मुलीवर शाळेतील शिक्षकानंच अत्याचार केल्याचं समोर आलं...  फक्त शिक्षकच नाही तर तिला शाळेत नेणारा रिक्षा चालकही त्यात सहभागी असल्याचं पुढे आलं... या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलीय मात्र या घटनेनं या मुलीचं आणि तिच्या कुटुंबाचं आयुष्यच बदलून गेलंय. 

'तिला न्याय मिळावा'

आठ वर्षांच्या चिमुकलीनं काढलेल्या एका चित्रात आपल्याला शाळा, सखेसोबती दिसतात... पण त्याचबरोबर डाव्या बाजूला बॅड मॅनही दाखवलेले दिसतात... चित्रातले हे बॅड मॅन, अत्याचार करणाऱ्यांनी तिच्या मनात किती खोलवर जखम केलीय हे सांगण्यासाठी पुरेसे आहेत. या मुलीवर तिच्याच शाळेतल्या शिक्षकानं, रिक्षाचालकानं अत्याचार केले. मुलगी शाळेत जायला घाबरायला लागल्यानंतर सगळा प्रकार उघड झाला... पोलिसांकडून याप्रकरणी कारवाई सुरू आहे मात्र त्यानं ही मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांचं दु:ख संपलेलं नाही... 

सामाजिक संघटनेचा आधार 

चिमुरडीचा वाढदिवस होता... पण, आमच्या समाजाचं कुणीही तिच्या वाढदिवसाला आलं नाही, अशी खंत व्यक्त करत आपल्या पोटच्या गोळ्याला न्याय मिळावा असं आर्जव तिच्या आईनं केलंय. 

पण, तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केअर सामाजिक संघटना पुढे सरसावली... आणि आनंदानं या चिमुरडीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. चिमुकलीच्या चेहऱ्यावर थोडा आनंद यावा, तिच्या कुटुंबीयांना आधार वाटावा, यासाठीच तिचा वाढदिवस केल्याचं केअर संघटनेनं म्हटलंय. 

एखादी घटना घडली की सगळेच तिचा निषेध करतात, मात्र त्या कुटुंबाला आधार किती कमी लोक देतात? याचं हे ज्वलंत उदाहरण... त्यामुळं या घटनांना आळा घालणं जितकं महत्वाचं आहे तितकंच अशा पीडितांच्या पाठिशी उभं राहणंही महत्वाचं आहे.