NDA Oath Ceremony: लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर रविवारी राष्ट्रपती भवनात (Rashtrapati Bhavan) एनडीएचा शपथविधी सोहळा (NDA Oath Ceremony) पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यासह नरेंद्र मोदींनी देशाचे पहिले पंतप्रधान दिवगंत पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या शपथविधीसाठी 8 हजार पाहुणे उपस्थित होते. यामध्ये अनेक देशांचे नेते, उद्योजक, बॉलिवूड स्टार्स होते. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये आमंत्रित न करण्यात आलेला एक पाहुणा दिसत आहे.
शपविधीदरम्यान पंतप्रधानांसह एकूण 72 मंत्र्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान यावेळी एका शपथविधीदरम्यान मागे एक प्राणी फिरताना कैद झाला आहे. हा गूढ प्राणी अत्यंत सहजपणे फिरत होता. पण चित्र स्पष्ट नसल्याने तो नेमका कोणता प्राणी होता याचं गूढ वाढलं आहे.
व्हिडीओत दिसत आहे त्याप्रमाणे भाजपाचे नवनिर्वाचित खासदार दुर्गा दास यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद आणि गोपनीयतेची शपथ देत होत्या. यावेळी शपथ पूर्ण झाल्यानंतर ते अभिवादन करण्यासाठी उठले असता मागे एक प्राणी चालताना दिसत आहे.
An animal was seen strolling back in the Rashtrapati Bhavan after MP Durga Das finished the paperwork
~ Some say it was a LEOPARD while others call it some pet animal. Have a look pic.twitter.com/owu3ZXacU3
— The Analyzer ( (@Indian_Analyzer) June 10, 2024
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी वेगवेगळ्या शंका व्यक्त करत आहेत. तो बिबट्या होता का? की मांजर किंवा कुत्रा होता? अशा शंका नेटकरी मांडत आहेत. याचं नेमकं उत्तर सापडलेलं नसलं तरी राष्ट्रपती भवनसारख्या ठिकाणी जिथे कडेकोट सुरक्षा असते तिथे थेट मंचावर प्राणी पोहोचल्याने चिंता व्यक्त होत आहे.
"हे एडिट केले आहे की काय? हे कोणाच्या लक्षात कसे आले नाही. मोठ्या मांजरासारखं दिसत आहे," असं एका युजरने म्हटलं आहे. "शेपटी आणि चालण्यावरुन तो बिबट्या वाटत आहे. लोक खरोखर भाग्यवान होते की ते शांतपणे पार पडलं," असं दुसऱ्याने लिहिलं आहे. दरम्यान याप्रकरणी राष्ट्रपती भवनाकडून अधिकृतपणे काही माहिती देण्यात आलेली नाही.
राष्ट्रपती मुर्मू यांनी 30 कॅबिनेट मंत्री, 36 राज्यमंत्री (MoS) आणि स्वतंत्र प्रभार असलेले पाच राज्यमंत्री यांच्यासह 72 सदस्यीय मंत्रिमंडळाला पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन आणि एस जयशंकर यांसारख्या महत्त्वाच्या व्यक्ती कॅबिनेट मंत्री म्हणून कायम आहेत. नव्या मंत्रिमंडळात एनडीए आघाडीतील 11 मंत्र्यांचा समावेश आहे.
पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, ते 140 कोटी भारतीयांची सेवा करण्यासाठी आणि भारताला प्रगतीच्या नवीन उंचीवर नेण्यासाठी मंत्री परिषदेसोबत काम करण्यास उत्सुक आहेत. पंतप्रधान मोदींनी सोमवारी सकाळी पदभार स्वीकारला आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीच्या पहिल्या फाईलवर स्वाक्षरी केली.