पाठीवरील दप्तराचं ओझं ३ किलोवरुन ३०० ग्रॅम

तसे ताशेरेही न्यायालयाने  वेळोवेळी ओढलेत. मात्र दप्तराचे ओझं कमी करण्याची एक अनोखी शक्कल अमरावतीच्या एका शिक्षकाने शोधली आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 16, 2017, 02:27 PM IST
पाठीवरील दप्तराचं ओझं ३ किलोवरुन ३०० ग्रॅम  title=

अमरावती : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी वारेमाप घोषणा झाल्यात. मात्र या समस्येवर कोणताही तोडगा शिक्षण विभागाला काढता आला नाही. तसे ताशेरेही न्यायालयाने  वेळोवेळी ओढलेत. मात्र दप्तराचे ओझं कमी करण्याची एक अनोखी शक्कल अमरावतीच्या एका शिक्षकाने शोधली आहे. 

दप्तराचे ओझे असेल कमी तर मिळेल स्वास्थ्याची हमी, असाच संदेश देत अमरावतीच्या या शिवाजी महाविद्यालयात अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय. ८ पुस्तकांचं ओझं कमी करुन परीक्षा अभ्यासक्रमानुसार एकच पुस्तक तयार करण्यात आलंय. 

परीक्षानिहाय अभ्यासक्रम पाहता पूर्ण वर्षभरासाठी सर्व विषयांचा समावेश असलेली चार पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात आलीत. यामुळं विद्यार्थ्यांचं दप्तराचं ओझं कमी झालंय. या शाळेतील शिक्षक निलेश चाफलेकर यांच्या संकल्पनेतून हा मिनी अभ्यासक्रम तयार करण्यात आलाय. 

या अनोख्या उपक्रमामुळे दप्तराचे ओझे ३ किलोवरुन कमी होऊन ३०० ग्रॅम झालंय. या उपक्रमात चाफलेकर यांना शाळेतल्या इतर शिक्षक आणि मुख्याध्यापकांचीही साथ लाभली.

या मिनी अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांवरील मानसिक दडपण कमी होऊन त्यांची अभ्यासातील प्रगतीसुद्धा वाढलीय. त्यामुळे चाफलेकर यांच्यासारखा हा अनोखा उपक्रम राज्यातील इतर शाळांनीही राबवण्याची गरज आहे.