राजकारणाला वय नसतं... गंगुबाई सरपंच @९४

राजकारण, मतदान म्हणजे आपलं काम नाही अस म्हणत आपल्या जबाबदारीपासून पळणाऱ्या तरुण वर्गाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलंय ते भांबुरवाडी गावच्या एका आजीबाईंनी...

Updated: Sep 7, 2016, 06:28 PM IST
राजकारणाला वय नसतं... गंगुबाई सरपंच @९४ title=

साईदिप ढोबळे, जुन्नर : राजकारण, मतदान म्हणजे आपलं काम नाही अस म्हणत आपल्या जबाबदारीपासून पळणाऱ्या तरुण वर्गाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलंय ते भांबुरवाडी गावच्या एका आजीबाईंनी...

९४ वर्षांच्या आजीबाईंनी सगळी राजकीय आव्हानं मोडीत काढत दणदणीत विजय मिळवत लोकशाहीत आपण कोण आहोत याची जाणीव करुन दिली आहे. 

उधळलेला गुलाल... शानदार मिरवणूक.. आणि अवघ्या गावाचा जल्लोष... हे चित्र गणेशोत्सवातलं असलं तरी गणरायासाठी नाही... तर हा जल्लोष होता सरपंचपदावर विराजमान झालेल्या ९४ वर्षांच्या गंगुबाई भांबुरेसाठी...

पुणे जिल्ह्यातल्या खेडजवळच्या भांबुरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात गंगुबाई उतरल्या आणि गावातल्या तगड्या राजकारण्यांना चारीमुंड्या चित करत विक्रमी मताधिक्यानं निवडून आल्या. विशेष म्हणजे सरपंचपद महिलेसाठी आरक्षित झालं. त्यामुळं गंगुबाईंनी केवळ सदस्यरदावर समाधान न मानता थेट सरपंचपदासाठी रस दाखवला आणि त्यावर मोठ्या दिमाखात विराजमानही झाल्या. 

९४ व्या वर्षी स्वत:चा जीव सांभाळताना जीव जातो. पण गंगुबाईंनी संपूर्ण गावालाच सांभाळण्याची मोठी जबाबदारी घेतलीय. राजकारण म्हणजे तरुणांचे काम, राजकारण म्हणजे पैशांवाल्यांचे काम अशी नकारात्मक मानसिकतेत जगणाऱ्यांना आजीबाईंनी जोरदार चपराक लावलीय. गंगुबाईंनी गावाच्या विकासाचा निर्धार केलाय. 

अवघ्या भांबुरवाडीला भांबुरे आजीचा अभिमान आहे... कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना निवडणूक लढवणे आणि ती जिंकणे ही सोपी गोष्ट नाहीय. पण एका आजीने सगळ्यांना चितपट करत केवळ तिचाच नाही तर अवघ्या गावचा विश्वास वाढवला आहे.

एका सर्वसामान्य कुटूंबातील आणि ९४ वर्षाच्या महिलेचा विजय म्हणजे केवळ गावच्या सरपंचपदाची निवडणुकीतला विजय नाही... तर हा विजय आहे अशिक्षित असूनही शिकलेल्या लोकांना शिकवणारा... हा विजय आहे मतदानापासून पळणाऱ्या तरुणाईला प्रगल्भ लोकशाहीचे पाईक होण्याचा... हा विजय आहे, मेरा देश बदल रहा है अस मनापासून सिद्ध करणाऱ्यांचा... गंगुबाईंच्या नव्या इनिंगला झी तासच्या शुभेच्छा...