विशाल वैद्य, कल्याण : कल्याणमध्ये पोलीस उपनिरीक्षकाला बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आलीय. यातला एक आरोपी अजूनही फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे.
हे सर्व आरोपी कल्याणमधल्या जरीमरी मित्र मंडळचे कार्यकर्ते आहेत. जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे अशी आरोप या चौघांवर ठेवण्यात आले आहेत.
कल्याणमध्ये पुन्हा एकदा खाकीवर हल्ला झालाय. गणेश विसर्जनादरम्यान गोंधळ घालणाऱ्या जरीमरी मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांना हटकल्यामुळं त्यांनी पोलीस उपनिरीक्षकावरच हल्ला चढवला आणि त्यांना पाण्यात बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
कल्याणच्या तिसगाव नाका परिसरात मंगळवारी रात्री तिसगाव नाका परिसरात पोलिस उपनिरिक्षक नितीन डगळे यांना चार जणांनी पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला. गणेश विसर्जनाच्या वेळी हा धक्कादायक प्रकार घडला. गणेश विसर्जन करताना वेळकाढूपणा करणाऱ्या कार्यकर्त्यांना डगळे यांनी हटकलं. याचाच राग येऊन संतप्त कार्यकर्त्यांनी डगळेंनाच तलावात बुडवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पवन ठाकूर यांनी दिलीय.
या घटनेनंतर सुमारे १० तास उलटूनही गुन्हा दाखल झाला नव्हता. हे प्रकरण दडपून कार्यकर्त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असावेत, अशी शंका रात्रभर येत होती. कल्याणचे भाजप पुरस्कृत आमदार गणपत गायकवाड आणि डीसीपी संजय शिंदे यांची मध्यरात्री पोलीस स्टेशनमध्ये बंद दाराआड सुमारे चार तास चर्चा झाली. त्यानंतर पोलीस आणि आमदार वेगवेगळ्या गाड्यांमधून बाहेर पडले आणि काही वेळानं पुन्हा परतल्याचंही चित्र पाहायला मिळालं. माध्यमांसमोर मात्र गायकवाडांनी हात वर केलेत.
या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड संताप दिसून आला. या हल्ल्याच्या निषेधार्थ कल्याणमध्ये उत्स्फूर्त मोर्चा काढण्यात आला तर दोषींवर कारवाईचं आश्वासन गृहराज्यमंत्र्यांनी दिलंय.
पोलिसांवर वारंवार हल्ले होणं, हे सामाजिक स्वास्थ्याला हानिकारक आहे. ऑन ड्युटी पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्या वृत्तीला वेळीच धडा शिकवला नाही, तर समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळं अशा समाजकंटकांवर लवकरात लवकर कारवाई होण्याची गरज आहे.