वाई हत्या प्रकरण; मृतदेह बाहेर काढताना कामगाराचा मृत्यू

बोगस डॉ. संतोष  पोळने सहा हत्या घडवून आणल्या. त्याने केलेले खून पचविण्यासाठी मृतदेह पुरलेत. 

Updated: Aug 23, 2016, 04:40 PM IST
वाई हत्या प्रकरण; मृतदेह बाहेर काढताना कामगाराचा मृत्यू title=

सातारा : बोगस डॉ. संतोष पोळ प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरा बसला. पोळने सहा हत्या घडवून आणल्या. त्याने केलेले खून पचविण्यासाठी मृतदेह पुरलेत. दरम्यान, त्याला अटक केल्यानंतर सहा मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी वाई पालिकेतील कर्मचाऱ्यांची मदत घेतली होती. त्यांच्यातील एका सफाई कामगाराचा सोमवारी सकाळी हृदयविकाराने मृत्यू झाला.

सुभाष विठ्ठलराव चक्के (४९) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. दरम्यान, सुभाष चक्के यांनी या प्रकरणाचा धसका घेतला होता, असा दावा नातेवाईकांनी केला आहे. 

सिरीयल किलर संतोष पोळ याने केलेल्या सहा खुनांतील मृतदेह पोलिसांनी वाई नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत उकरुन बाहेर काढले. बाहेर काढण्यात आलेल्या मृतदेहाचे फक्त सांगाडेच शिल्लक होते. त्यामुळे त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागला. दरम्यान, खोदकाम करताना ताण सहन न झाल्याने ते तणावाखाली होते. त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे नातेवाईकांनी सांगितले. चक्के हे पालिकेत गेली २४ वर्षे सफाई कामगार म्हणून काम करीत होते.

 

संतोष पोळने २००३ पासून खून केलेल्या सहाजणांच्या हाडांच्या सांगाड्यांची ओळख पटविण्यासाठी हे सांगाडे सोमवारी मुंबईत पाठविण्यात आले. तज्ज्ञ मंडळी खड्ड्यात उतरून चाळणीने माती चाळून हाडे गोळा करत होती. हे सांगाडे नक्की कोणाचे? याची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.