सिंधुदुर्ग : आंबोली घाटात खेकड्याच्या एका दुर्मिळ प्रजातीचा शोध लागलाय. पण सगळ्यात आश्चर्य गोष्टी ही आहे की, या प्रजातीचं नामकरण महाराष्ट्रातल्या एका वजनदार राजकीय घराण्याच्या आडनावावरुन झालंय.
या खेकड्याच्या भगव्या रंगाशी शिवसेनेचा तसा दूरदूरचा संबंध नाहीये, पण शिवसेना पक्ष चालवणाऱ्या ठाकरे या आडनावाशी मात्र तो जरुर आहे. यामागची गोष्ट आश्चर्यकारक आहे.
सिंधुदुर्गातल्या आंबोली घाटात खेकड्याच्या या दुर्मिळ प्रजातीचा शोध लागलाय. हा शोध लावणारे दुसरं तिसरं कुणी नसून चक्क ठाकरे आहेत...शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा धाकटा चिरंजीव तेजस यानं या खेकड्याच्या या दुर्मिळ प्रजातीला शोधलंय.
वन्यजीव प्रेमी असलेले तेजस कला शाखेच्या दुस-या वर्षात शिकतात. गेल्यावर्षी जुलैमध्ये ते दूर्मिळ प्रजातीच्या सापांचा अभ्यास करण्यासाठी कोकणात गेले होते. त्यांच्यासोबत वन्यजीव अभ्यासकही होते. या सर्वांना दुर्मिळ साप काही आढळले नाहीत.
मात्र सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यात रघुवीर घाटात वाहणाऱ्या धबधब्यात खेकड्यांच्या काही प्रजाती मात्र सापडल्या. स्वतः वन्यजीव प्रेमी असल्यानं तेजस यांना या खेकड्यांमध्ये अन्य खेकड्यांपेक्षा वेगळेपण आढळलं. त्यामुळं त्यांनी ते खेकडे झुऑलाजी सर्वे ऑफ इंडियाकडे पाठवले.
आतापर्यंत खेकड्यांच्या शंभर प्रजातींची नोंद झालीय. वन्यजीवांवर आंतराष्ट्रीय स्तरावर अभ्यास करुन त्यावर ठाम निरीक्षण नोंदवणा-या झूटाक्सा या साप्ताहिकाला या खेकड्यांची माहिती कळवण्यात आली. त्यांनाही अभ्यास करुन या प्रजाती दुर्मिळ असल्याचंच शिक्कामोर्तब केलंय.
पुढील अभ्यासासाठी त्यांच्या गुणधर्म आणि वर्णानुसार खेकड्यांची लॅटिन भाषेत नावं ठेवण्यात आलीत. गॅटिएना एत्रोपरपरिआ, गॅटिएना स्पेलिंडिडा, गुबरनॅतोरिएना एल्कोकी, गुबरनॅतोरिएना वॅगी अशी नावे त्यांना देण्यात आली आहेत.
सर्वात महत्वाचे म्हणजे गडद भगव्या रंगाच्या खेकड्याचं नाव गुबरनॅतोरिएना ठॅकरी असं ठेवण्यात आलंय. हा योगायोग मानावा की आणखी काही ?...या प्रजाती तेजस ठाकरेंनी शोधल्यामुळे त्या खेकडयाला ठाकरे आडनावाचा संदर्भ दिला असावा अशी माहिती मिळतेय.