रत्नागिरी : शहरातील बँकेचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी तब्बल 677 कोटींची आवश्यकता आहे. मात्र, आरबीआयकडून नोटाच न आल्यामुळे रत्नागिरीतल्या बँक वाल्याने तारेवरची कसरत करावी लागत आहे.
बँकेतच पैसा नसेल तर तो मार्केटमध्ये येणार कुठून त्यामुळे रत्नागिरीतली कोट्यवधी रूपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. याचा त्रास होतोय तो सर्वसामान्य नागरिकांना. रत्नागिरीतल्या बाजारपेठांमध्ये असं चित्र कधीच पाहायला मिळत नव्हतं. मात्र पंतप्रधानांनी नोट बंदीचा निर्णय घेतला आणि बाजारपेठा ओस पडू लागल्या.
कोकणातल्या पारंपरिक मच्छी व्यवसायही या निर्णयामुळे कोलमडलाय. बाजारपेठांमधील कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाला आहे. तर बँका आणि एटीएमबाहेर नागरिकांची गर्दी कमी झालेली नाही. दहा दिवसांनंतरही कुठलेच व्यवहार सुरळीत झालेले नाहीत. बँकांच्या बाहेर रांगा लागल्या आहेत तर एटीएममध्ये पैसेच नाहीत. त्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झालेत.
रत्नागिरीत बँकिंग सुरळीत होण्यासाठी जिल्ह्याला 677 कोटी रुपये चलनाची गरज असल्याचा प्रस्ताव बँक ऑफ इंडियानं आरबीआयला सादर केला आहे. दरम्यान आरबीआयकडून 9 नोव्हेंबरला आलेल्या 2 हजार रूपयांच्या नव्या चलनानंतर अतिरिक्त चलन प्राप्त न झाल्याचं अधिकारी सांगत आहेत.
जुन्या नोटा रद्दच्या निर्णयाने जिल्हास्तरावर मोठ्याप्रमाणात गोंधळ निर्माण झाला आहे. त्यावर नियंत्रण मिळविताना बँक प्रशासनाची तारांबळ उडत आहे. 8 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत बँकांमध्ये जुन्या नोटांच्या रुपाने सुमारे अठराशे कोटीहून अधिक रक्कम जमा झाली आहे. या पैशाचे करायचे काय यासंदर्भात अद्यापही बँकांना केंद्रस्तरावरुन निर्देश प्राप्त झालेले नाहीत...तसेच कर्ज वितरणासह बँकेचे अन्य व्यवहार ठप्प झालेत.
प्रतिदिन जिह्यात पन्नास कोटीचे व्यवहार होतात. गेल्या नऊ दिवसात सुमारे 450 कोटीची या बाजूने होणारी उलाढाल थांबली. सध्या फक्त जुन्या नोटा स्विकारणे आणि नवीन नोटा उपलब्ध करुन देणे एवढेच काम बँकांना करावे लागत आहे. मात्र नवीन नोटाच प्राप्त न झाल्यामुळे बँकाना तर तारेवरची कसत करावी लागत आहे.