रत्नागिरी : कोकणातल्या बहुतांश शिमगोत्सवाची सांगता होते ती गुढीपाडव्याच्या आसपास. शिमगोत्सवाची परंपरा जशी वेगवेगळी, तशी सांगताही अनोखीच असते. राजापूरजवळच्या रायपाटण गावातली या दिवशी रोंभाट परंपरा पाहायला मिळते.
गावाच्या मध्यावर वर्षानुवर्ष ठरलेल्या जागी उभी असलेली सुरमाडाची होळी. होळीसमोर रूप लावलेली ग्रामदेवतेची पालखी आणि पालखीसमोर भक्तीभावानं-श्रद्धेनं लोटांगण घालणारी कोकणी माणसं... हे चित्र शिमगोत्सवात कोकणातल्या गावागावात दिसतं... गुढीपाडव्याच्या आसपास या शिमगोत्सवाची सांगता होते. त्यानिमित्त राजापुर जवळच्या रायपाटण गावात अनोख्या रोंभाटची परंपरा आजही जपली जातेय. गावाची बारा वाड्यांची मंडळी एकत्र जमतात आणि गावाचे मानकरी गा-हाणं घालतात.
या नंतर सुरु होतो मुख्य सोहळा. एक ग्रामस्थ मानक-यांनी दिलेला नारळ होळीच्या मध्यावर जाऊन बांधून येतो. आणि मग सुरु होतो संघर्ष तो नारळ मिळवण्यासाठीचा. पण हा नारळ मिळवणं तितकंसं सोपे नसतं. कारण नारळ आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये असतात ते इथले मानकरी. गावाचे तीन मानकरी आपल्या अन्य सहका-यांच्या खांद्यावर उभे असतात... आणि होळीवर चढू पाहणाऱ्या बारा वाड्यातील ग्रामस्थांना रोखतात. तीन मानकरी आणि शेकडो ग्रामस्थ असा हा खेळ रंगलेला असतो.
बारा वाड्यातील हा संघर्ष तासनतास सुरु असतो. प्रदीर्घ संघर्षानंतर मानकरी अखेर एका ग्रामस्थाला वर चढू देतात. हा तरुण नारळ काढतो आणि पुन्हा मानक-यांच्या हातात देतो. ज्या वाडीचा तरुण हा नारळ काढतो त्या वाडीला सन्मान मिळवून दिल्याबद्दल त्याला उचलून अक्षरशः नाचवलं जातं.
रोंभाट इथंच संपत नाही. हे उभं रोंभाट संपलं की सुरु होतं आडवं रोंभाट. मानक-यांच्या हातातला नारळ मिळवण्यासाठी पुन्हा एकदा संघर्ष सुरु होतो. हे आडवं रोंभाट सरकत सरकत कितीही लांब जावू शकतं. अखेर ज्या व्यक्तीच्या हातात तो नारळ लागतो तो होळीच्या दिशेने धावत येतो आणि होळीजवळ तो नारळ फोडतो. ज्या चव्हाट्यावर हा सगळा खेळ होतो तिथं मग पाण्याचं शिंपण केलं जातं.
या दिवशी गावात घराघरात मांसाहाराचा नैवेद्य असतो. बारा वाड्यातल्या छोट्या छोट्या होळ्यांवर देखील असाच रोंभाट खेळला जातो. कोकणातल्या या अनोख्या परंपरामध्ये तिथली समाज व्यवस्था आणि राजसत्ता यांचं चित्रच प्रतिबिंबित होत असतं. राजापूर तालुक्यातील रायपाटण गावात रंगणारं हे उभं आणि आडवं रोंभाट एक चित्तथरारक अनुभव देते.