बारामती : धनगर समाजाचं आरक्षणासाठी गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण अखेर मागे घेण्यात आलंय. धनगर समाजाच्या महिलांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आलंय. महायुतीच्या नेत्यांकडून उपोषण सोडण्यात येणार होतं. मात्र आंदोलकांमध्ये राजकीय मतभेद झाल्यामुळं महिलांच्या हस्तेच उपोषण सोडण्यात आलं.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, भारतीय समाज पक्षाचे महादेव जानकर, शिवसेना आमदार विजय शिवतरे उपस्थित होते. धनगर समाजाच्या आरक्षणात राज्य सरारकारच अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप यावेळी भाजपचे प्रदेधाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.
तसंच महायुतीची सत्ता आल्यानंतर आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लागू देता धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलं. दरम्यान, राज्यात महायुतीचे सरकार आलं आणि त्यांनी तीन महिन्यांत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही तर महायुतीतून बाहेर पडू असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकरांनी केलंय.
आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आंदोलनात उपोषण सोडण्यावरून फूट पडण्याची शक्यता आहहे.. कारण या आंदोलनाला राजकीय संसर्ग जडल्याची चर्चा आहे. बारामतीत उपोषणाला बसलेल्या काही आंदोलकांनी महायुतीच्या नेत्यांकडून उपोषण सोडण्यास नकार दिलाय. या आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यात महायुतीसह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.
या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या नेत्यांकडून उपोषण सोडणार नसल्याची भूमिका घेतलीय. त्यामुळं या आंदोलनातले मतभेद समोर आले आहेत. आता नाराज कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येत आहे. त्यात याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र यामुळं आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या मंचावर राजकारण सुरू झाल्याचं दिसतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.