बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या नातेवाईकांना मारहाण

नाशिक जिल्हा न्यायालयाच्या आवारात संतप्त जमावानं आरोपीच्या नातेवाईकांना जबर मारहाण केलीय. 

Updated: May 12, 2017, 08:05 PM IST
बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या नातेवाईकांना मारहाण title=

नाशिक : नाशिक जिल्हा न्यायालयाच्या आवारात संतप्त जमावानं आरोपीच्या नातेवाईकांना जबर मारहाण केलीय. 

नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५१ वर्षीय  सुभाष झवर या नराधमाने अवघ्या साडे तीन चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घृणास्पद घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. 

आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने मुलीला तिच्या घरातून स्वत:च्या घरात नेऊन त्याने अत्याचार केले. चिमुरडीच्या गुप्तांगासह संपूर्ण शरीराला त्याने चावा घेतला. या संशयिताला आज जिल्हा न्यायालयात हजर करणार होते. 

मात्र, त्याला चोप देण्यासाठी परिसरातील नागरिक न्यायालयाच्या आवारात दबा धरून बसले होते. यावेळी, आरोपी इथं आला नाही मात्र त्याच्या नातेवाईकांना चिमुरडीच्या नातेवाईकांनी आणि स्थानिकांनी बेदम मारहाण केली. 

या आरोपीचे वकीलपत्र कोणी घेऊ नये, अशी मागणीही स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली. घटनेची नागरिकांमध्ये चीड असल्याने दोन दिवस झालेत तरीही जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या संशयिताला पोलिसांनी न्यायालयात हजर केलेलं नाही.