लातूर : दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात पावसानं घेतलेल्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर दमदार पावसाने हजेरी लावली आहे.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात चांगला पाऊस बरसल्यामुळे पिकांना जीवदान मिळालंय. निलंगा तालुक्यात ८४ मिमी, शिरूर अनंतपाळ तालुक्यात ९२ मिमी, चाकूर तालुक्यात ७७ मिमी आणि उदगीर तालुक्यात ९० मिमी इतकी नोंद झाली आहे. निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी परिसरात २४ तासात १३८ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
मुसळधार पावसामुळे निलंगा तालुक्यातील तेरणा नदीवरील तगरखेडा, मदनसुरी, लिंबाळा उच्चस्तरीय बंधाऱ्याचे तीन दरवाजेही उघडण्यात आले आहेत. तर लातूर तालुक्यात ३९ मिमी, औसा तालुक्यात ५३ मिमी, रेणापूर तालुक्यात ४८ मिमी, अहमदपूर तालुक्यात ६० मिमी, जळकोट तालुक्यात ५५ मिमी आणि देवणी तालुक्यात ५३ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ५९६ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. एकूणच या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील नागरिक सुखावले आहेत.