अधिवेशन... पहिला आठवडा बिनकामाचा

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा बिनकामाचाच ठरला. आमदारांबरोबरच मंत्रीही या अधिवेशनाबाबत गंभीर नसल्याचे पहिल्या आठवड्यातच दिसून आले.

Updated: Jul 20, 2013, 04:00 PM IST

www.24taas.com,झी मीडिया, मुंबई/b>

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा बिनकामाचाच ठरला. आमदारांबरोबरच मंत्रीही या अधिवेशनाबाबत गंभीर नसल्याचे पहिल्या आठवड्यातच दिसून आले. अधिवेशनाबाबतची गंभीरताच निघून जात असल्याने विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनीही सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त करावी लागली.
पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला विरोधकांनी सरकारविरोधात एल्गार पुकारला होता. अनेक मुद्यांवर सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली होती. मात्र विरोधकांचा हा प्रभाव विधिमंडळात पहिल्या आठवड्यात दिसला नाही. पहिल्या दिवशी प्रश्नोत्तराचा तास आणि शोकप्रस्ताव झाल्यानंतर दुपारीच काम संपवण्यात आलं. तर दुसऱ्या दिवशी विरोधकांनी असमान निधी वाटपाच्या मुद्यावरून विधिमंडळाचे कामकाज होऊ शकले नाही. तिसऱ्या दिवशीही याच मुद्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर विरोधक शांत झाले.
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तर कहरच झाला. मुंबईत सातत्याने कोसळणा-या इमारती आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या प्रश्नावर चर्चा होणार होती मात्र कोरम अभावी ही चर्चा झालीच नाही शिवाय चर्चेच्या वेळी मुख्यमंत्रीही हजर नव्हते. सभागृहात २८८ आमदार आहेत, कामकाज सुरू ठेवण्यासाठी २७ आमदार संख्या म्हणजेच कोरम असेल तर सभागृहाचे कामकाच चालू शकते. मात्र काल सभागृहात २७ आमदारही हजर नव्हते. त्यामुळे कोरम अभावी कामकाज तहकूब करावं लागलं.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात मंत्री गैरजहर असल्यामुळे काही लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की ओढावली. मंत्रीच विधिमंडळाच्या कामकाजाबाबत गंभीर नसल्याने विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. गैरहजर मंत्र्यांना निलंबित का करू नये असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. विधिमंडळाच्या कामकाजाबाबत आमदारांबरोबरच मंत्रीही गंभीर नसल्याने हे कामकाज म्हणजे एक सोपास्कर ठरतो आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.