पुण्यात चोरीच्या संशयावरून जाळलेल्या मुलाचा रुग्णालयात मृत्यू

दुचाकीच्या बॅटरी चोरल्याचा संशयावरून अंगावर पेट्रोल ओतून जाळण्यात आलेल्या सावन राठोड या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

Updated: Jan 15, 2016, 03:10 PM IST
पुण्यात चोरीच्या संशयावरून जाळलेल्या मुलाचा रुग्णालयात मृत्यू  title=

पुणे : दुचाकीच्या बॅटरी चोरल्याचा संशयावरून अंगावर पेट्रोल ओतून जाळण्यात आलेल्या सावन राठोड या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

कसबा पेठेतील पवळे चौक परिसरात बुधवारी दुपारी ही घटना घडली होती. आज त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंभीर भाजलेल्या मुलावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी इब्राहिम मेहबूब शेख (३५) इम्रान तांबोळी (२८) झुबेर तांबोळी (२६,  तिघे रा. कसबा पेठ) यांना अटक केली होती. 

सावन हा फिरस्ता असून तो कचरा वेचण्याचे काम करत होता. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. सावन हा बुधवारी कसबा पेठेतील पवळे चौक परिसरात आला. तेथील एका देशी दारू विक्री करणाऱ्या दुकानात त्याने दारू प्यायली. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तो तांबट हौद चौकाच्या दिशेने निघाला होता. त्या वेळी आरोपी इब्राहिम, झुबेर आणि इम्रान यांनी सावन याला अडविले होते.

तू या परिसरात चोऱ्या करतोस. दुचाकीच्या बॅटऱ्या देखील चोरल्या आहेस,असे आरोपी सावन याला म्हणाले होते. त्याचवेळी जिवंत जाळण्याची धमकी दिली होती. तसेच त्याला मारहाण केली आणि पेटवून दिले.

तिघांनी त्याला धमकावून तेथे लावलेल्या एका टेम्पोत बसण्याची सूचना केली. सुमारे अर्धा तास आरोपींनी सावन याला डांबून ठेवले. त्यानंतर आरोपी इब्राहिम, झुबेर आणि इम्रान हे गंभीर भाजलेल्या सावन याला टेम्पोत बसवून डेंगळे पुलानजीक गेले. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास महापालिका भवनजवळ असलेल्या बसस्थानक परिसरात सोडून तिघे आरोपी टेम्पोतून पसार झाले. 

त्याचवेळी दोन कचरावेचणारे मित्र भेटले. त्याने त्यांना या घटनेची माहिती मित्रांना दिली. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोघा मित्रांनी त्याला जवळच असलेल्या कसबा पेठ पोलीस चौकीत नेले. तेथून पोलिसांनी त्याला तातडीने ससून रुग्णालयात नेले. सावन हा गंभीर भाजला असून त्याने रात्री पोलिसांना जबाब दिला. त्याच्या जबाबानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.