पुणे : डाळींची टंचाई आणि कडाडलेले भाव या पार्श्वभूमीवर पुण्यात सरकारने व्यापाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यातल्या मार्केट यार्डातली दुकानं सील करण्यात आली.
अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने ही कारवाई केलीय. डाळींची साठेबाजी करण्यात आली होती का याचा तपास केला जाणार आहे. पुण्यातले मार्केट यार्डातले व्यापारी आंदोलनाला उतरले आहेत. सोमवारी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने मार्केट यार्डातल्या व्यापा-यांना नोटीसा बजावल्या. त्यावंतर रात्री काही दुकानांना सील ठोकण्यात आलं.
या व्यापा-यांनी डाळींची साठेबाजी केलीय का हे प्रशासनाला तपासायचं होतं. पण रात्री दुकानं बंद होती. सकाळपर्यंत वाट पाहून नोटीसा बजावल्या असत्या तर डाळींचा साठा इतरत्र हलवला जाण्याची भीती प्रशासनाला होती. त्यामुळे रात्रीच दुकानांना सील ठोकण्यात आलं. संध्याकाळी नोटीस आणि रात्री दुकानांना सील एवढ्या झपाट्याने कारवाई झाल्याने व्यापारी संतापले.
प्रशासनानं मात्र कारवाईचं समर्थन केलंय. सुरवातीला व्यापाऱ्यांनी दुकानं उघडून साठ्याची तपासणी करण्यास नकार दिला. त्यावर प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरु करण्याची भूमिका घेतली. त्यांनतर मात्र व्यापाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेत , दुकानात तपासणी करण्यास मान्यता दिली. आता मार्केट यार्ड आणि शहर परिसरातील २०० ते २५० घाऊक व्यापाऱ्यांची तपसणी केली जाणार आहे.
घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांनी डाळींचा किती साठा करावा हे स्पष्ट करण्यात आलेली नाही. सर्व व्यापाऱ्यांची तपासणी करून रिपोर्ट यायला दोन दिवस लागणार आहे. त्यानंतरच, डाळींची साठेबाजी होतेय कि नाही हे स्पष्ट होणार आहे. पण ज्या धडाडीने नोटीसा बजावून सील ठोकण्यात आले. त्याच धडाडीने आणि प्रामाणिकपणे पुढील कारवाई देखील व्हायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.